इस्त्रीच्या कपड्यांचे पैसे मागितले म्हणून सोलापूर जिल्ह्यातील एका परीट बांधवाला बेदम मारहाणीद्वारे गंभीर जखमी करण्याच्या घटनेचा निषेध करण्याबरोबरच मारहाण करणाऱ्या चौघा जणांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी मराठा रजक समाज, बेळगाव आणि परीट मडिवाळ संघातर्फे करण्यात आली आहे.
मराठा रजक समाजाचे अध्यक्ष विठ्ठल भरमा पाळेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील परीट बांधवांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
निवेदन सादर करण्यापूर्वी पाळेकर यांनी प्रसार माध्यमांना आपल्या मागणी बद्दल माहिती दिली. सोलापूर (महाराष्ट्र) जिल्ह्यातील करमळा शेळपटनागा गावातील कृष्णा महादेव सोनटक्के हा परीट बांधव कपडे इस्त्री करण्याचे काम करतो.
त्याने एका कुटुंबाकडून इस्त्री केलेल्या कपड्यांचे पैसे मागितले असता त्या कुटुंबातील चौघाजणांनी कृष्णा याला बेदम मारहाण केली. लोखंडी रॉड व लाट्याकाठ्याने केलेल्या हल्ल्यात कृष्णाचा पाय मोडला असून हाताला गंभीर इजा झाली आहे परिणामी सध्या तो अपंग अवस्थेत आहे, असे त्यांनी सांगितले.
सदर घटनेनंतर मारहाण करणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी सोलापूरसह आजूबाजूच्या चार जिल्ह्यातील परीट बांधवांनी आवाज उठवून प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. आम्ही बेळगावचे परीट बांधव देखील त्या मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध करून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत आहोत. कृष्णा सोनटक्के या आमच्या समाज बांधवाला जबर मारहाण करणाऱ्या त्या चार गुंडांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी आणि त्यांना कडक शिक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी आहे.
यासाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्यावतीने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतील अशी आमची अपेक्षा आहे, असे विठ्ठल पाळेकर शेवटी म्हणाले. निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मराठा रजक समाज आणि परीट मडिवाळ संघाचे पदाधिकारी तसेच परीट बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्वांनी गाडगे बाबांच्या जयजयकारसह जोरदार निदर्शने केली.