बेळगाव लाईव्ह : साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्या उपस्थितीत आज कडोली गावात ३८वे साहित्य संमेलन दिमाखात पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी परभणी येथील साहित्यिक नितीन सावंत हे होते. चार सत्रात पार पडलेल्या या संमेलनात साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
साहित्य संमेलनाची सुरुवात ह.भ.प. प्रवीण मायाण्णा यांच्याहस्ते पालखी पूजन झाल्यानंतर संत-साहित्य संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ग्रंथदिंडीने झाली. अभंग आणि टाळमृदंगाच्या गजरात ग्रंथदिंडी संमेलन मंटपापर्यंत पोहोचली.
संमेलनस्थळी ग्रंथदिंडी पोहोचल्यानंतर कंग्राळी बी. के. ग्रामपंचायतीचे अध्यक्ष यल्लोजीराव तानाजीराव पाटील यांच्याहस्ते उद्घाटन पार पडले. संमेलन नगरीचे उद्घाटन मेकॅनिकल इंजिनियर कुशल कुट्रे यांच्याहस्ते पार पडले.
उद्घाटन समारंभ झाल्यानंतर परभणी येथील सुप्रसिद्ध साहित्यिक नितीन सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संतांचे साहित्यातील योगदान या विषयावर आपले विचार मांडले. जे साहित्य विकृती शिकवत असेल, जे साहित्य माणसाला माणसापासून तोडत असेल त्याला साहित्य कसे म्हणावे? जे साहित्य चांगुलपणा शिकवते अशाच साहित्याचे प्रयोजन असावे. किंबहुना साहित्याने तशीच भूमिका घेणे आवश्यक आहे.
जे साहित्य चांगुलपणा जोडायला शिकवत ते साहित्य. अशा चांगुलपणा जोडणाऱ्या साहित्याला हजारो वर्षांच्या महापुरुषांची प्रेरणा आहे, वारसा आहे. साहित्याने मानवी जीवनाला उच्च पातळीवर नेण्यासाठी मोठी कामगिरी केली आहे. मात्र मध्यंतरी बंदिस्त, कपाटात, खोलीत आणि वाचनालयापुरतं मर्यादित राहणारं साहित्य आलं आणि यामुळे जनमाणसाचा साहित्याशी संपर्क तुटला. यादरम्यान संतनामाचा लोक जागर करू लागले आणि संतसाहित्य लोकांच्या ओठावर येऊ लागलं. संतांनी लोकमनाचा ठाव घेतला. मात्र आजकालच्या साहित्यिकांना लोकमनाचा ठाव घेता आला नाही.
जाडजूड ग्रंथ निर्मिती करून प्रकाशन, समीक्षा आणि सरकारी पुरस्कार इतपत मर्यादित साहित्य आल्याने साहित्यासह साहित्यिकांचाही जनमाणसाशी संपर्क तुटला. भविष्यात अदानी, अंबानी, टाटा यांच्या कुटुंबातील महिलांचा नाही तर रमाई, भिमाई, जिजाई यांचा इतिहास लिहिला जाईल आणि यामुळे साहित्यिक, सामाजिक आणि राजकीय क्रांती होईल. असे विचार नितीन सावंत यांनी मांडले. साहित्यिकांचा जनतेशी समन्वय असणे गरजेचे आहे.
बंद खोल्यांमध्ये संतगुरुंच्या चोपड्या चाळून लिहिलेले साहित्य हे निरुपयोगी असून जे साहित्य लोकाभिमुख, समाजाभिमुख आणि जनमाणसाच्या हृदयाला हात घालत नाही ते समाज बदलासाठी निरुपयोगी साहित्य आहे, असे विचार नितीन सावंत यांनी मांडले.
अध्यक्षीय भाषणानंतर बहारदार कविसंमेलन पार पडले. या संमेलनात सांगली येथील प्रा. डॉ. दीपक स्वामी, महेश कराडकर, नाना हलवाई यांच्या सहभागातून मनाचा ठाव घेणाऱ्या कविता सादर करण्यात आल्या. अंतर्मुख आणि अवाक करणाऱ्या तर काही भावनांचा ठाव घेणाऱ्या कविता या संमेलनात सादर करण्यात आल्या. दुपारी दुरदुन्डेश्वर मठाच्या प्रांगणात स्नेहभोजन आटोपल्यानंतर तिसऱ्या सत्रात अहमदनगर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमळकर यांचे ‘माझा मराठाचि बोलू कवतिके’ या विषयावर व्याख्यान पार पडले. यानंतर चौथ्या सत्रात शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांचा ‘सह्याद्रीचा सिंह गर्जतो’ हा पोवाडा कार्यक्रम पार पडला.
सीमाभागात पुन्हा साहित्य संमेलनांना बहर आला असून उत्तमोत्तम साहित्यिकांची व्याख्याने आयोजित करण्यात येत असल्याने साहित्य रसिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशाचप्रकारे भविष्यातदेखील साहित्य संमेलन आयोजकांनी साहित्य रसिकांसाठी पर्वणी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी साहित्य रसिकातून होत आहे. रविवारी ग्रामीण भागासह बेळगाव परिसरात अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती. मात्र कडोली येथे भरविण्यात आलेल्या साहित्य संमेलनास साहित्य रसिकांची उपस्थिती लक्षणीय होती.