Friday, December 20, 2024

/

महात्मा फुले आरोग्य योजना सीमाभागातील जनतेसाठी लागणार मार्गी

 belgaum

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओ  एस डी आणि आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज बुधवारी बेळगावला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत चर्चा केली.

बेळगावला दिलेल्या भेटी प्रसंगी मंगेश चिवटे यांनी चव्हाट गल्ली येथील देवदादा सासनकाठी असलेल्या श्री ज्योतिबा मंदिराला भेट देऊन देवदर्शन घेतले. याप्रसंगी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्राचार्य आनंद आपटेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव अशोक कंग्राळकर, सुमित तारिहाळ,लक्ष्मण किल्लेकर,आर एस पवार श्री ज्योतिबा मंदिर विश्वस्त समितीचे सदस्य यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला.

यावेळी बोलताना मंगेश चिवटे यांनी महाराष्ट्र शासनाकडून मराठी बांधवांसाठी महात्मा फुले आरोग्य योजनेसह विविध योजनांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली आहे महाराष्ट्रातील जनते प्रमाणे सदर योजनांचा लाभ सीमा भागातील मराठी भाषिकांना देखील मिळणार आहे. तथापि सध्या त्या संदर्भातील तांत्रिक बाबीवर चर्चा सुरू असून येत्या 15 दिवसात महात्मा फुले आरोग्य योजने संदर्भात मार्गदर्शक सूची जारी केली जाईल.

त्यानंतर ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये ही योजना सुरू आहे त्या हॉस्पिटल्समध्ये सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रातील जनतेप्रमाणे वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध असेल. अवघड खर्चिक शस्त्रक्रिया तसेच इतर महागडे वैद्यकीय उपचार यासाठी विशेष करून पिवळे रेशन कार्ड असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महात्मा फुले आरोग्य योजना जशी फायदेशीर ठरत आहे तशी ती सीमा भागातील मराठी बांधवांसाठी फायद्याची ठराविक यासाठी मार्गदर्शक सूची तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तत्पूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विभिन्न खर्चिक वैद्यकीय उपचारासाठी दीड लाख रुपयांपर्यंतची मदत महाराष्ट्राप्रमाणे सीमा भागातील लोकांनाही देण्यात येणार आहे असे सांगून गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंगेश चिवटे यांनी केले.

माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी यावेळी बोलताना सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांना पेन्शन लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही हुतात्म्यांच्या वारसांना सुरुवातीपासूनच पेन्शन मिळालेले नाही त्यांना आणि लढ्यात जखमी होऊन अपंग झालेल्यांना देखील पेन्शन लागू करावी, अशी मागणी केली. तसेच महाराष्ट्र सरकारच्या अटी हे कांही हुतात्म्यांच्या वारसांना पेन्शन न मिळण्याचे कारण असल्याचे सांगितले.Mes chivte

महाराष्ट्र सरकारच्या अटीनुसार हुतात्म्यांचे आई -वडील किंवा पत्नी यांनाच पेन्शन मिळते. शोकांतिका म्हणजे हुतात्म्यांच्या मुलांना पेन्शन लागू होत नाही. एकंदर आई -वडील नसलेल्या अथवा पत्नी नसलेल्या हुतात्म्याचे पती, मुल-मुली यासारख्या वारसांना पेन्शनपासून वंचित रहावे लागले आहे. हुतात्मा लक्ष्मण गावडे, मधु बांदेकर, कारागृहात निधन पावलेले बाळू निलजकर, गोपाळ अप्पू चौगुले आणि निपाणीच्या कमळाबाई चौगुले या हुतात्म्यांचे वारस ही त्याची उदाहरणे आहेत. कमळाबाई चौगुले यांच्या पश्चात पती आणि मुलगी होती.

परंतु महाराष्ट्र सरकारच्या अटीमुळे त्या दोघांनाही पेन्शन मिळू शकली नाही अशी माहिती देऊन महाराष्ट्र शासनातर्फे हुतात्म्यांच्या वारसांना पेन्शन देण्याच्या अटींमध्ये सुधारणा करून इतर हुतात्म्यांच्या आई -वडील किंवा पत्नी व्यतिरिक्त अन्य नातलगांना पेन्शन मिळण्याची तरतूद केली जावी, अशी विनंती माजी महापौर अष्टेकर यांनी केली. त्यावर चिवटे यांनी या सर्व बाबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.