बेळगाव लाईव्ह : हल्ली शिक्षणापेक्षाही शिक्षणसंस्था निवडणे आणि शिक्षण संस्थांनी आपल्या मुलांना निवडणे हे सर्वात मोठे आव्हान पालकांसमोर उभे आहे. शिक्षणाचा पहिला पाया असणाऱ्या शिशु-अंकुर म्हणजेच एलकेजी आणि युकेजीच्या टप्प्यापासूनच पालकांना आपल्या पाल्याला प्रवेश मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तासनतास, रात्रंदिवस रांगा लावून प्रवेश मिळविण्याची लकब सध्या पालकांना आत्मसात करण्याची वेळ आली आहे.
आगामी शैक्षणिक वर्षात आपल्या चिमुरड्याला नामांकित शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांना फेब्रुवारीपासूनच शिक्षण संस्थांचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत.
तीन महिन्यांपूर्वीच म्हणजेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून एलकेजी पूर्वप्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून बेळगावमधील काही नामवंत खासगी शाळांनी एलकेजी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठी शाळेमधून अर्ज घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील दोन वर्षात कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर अनेक पालकांनी सरकारी शाळेत आपल्या मुलांना प्रवेश घेणे पसंत केले. ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षात पालकांची कसरत काहीशी कमी केली. मात्र सध्या कोविड प्रमाण कमी झाल्यामुळे पुन्हा कॉन्व्हेंट आणि नामांकित शाळेच्या प्रवेशासाठी पालकांची धडपड सुरु झाली आहे.
बेळगावमधील काही शाळांनी ऑनलाईन तर काही शाळांनी ऑफलाईन अर्जही उपलब्ध करून दिले आहेत. केवळ प्रवेश प्रक्रियाच नव्हे तर विविध कागदपत्रांची पूर्तताही पालकांना शाळेला करावी लागणार असल्याने पालकांची आतापासूनच लगबग सुरु झाली आहे.