बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनी आतापासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून मागील आठवड्यात ग्रामीण मतदार संघाच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली.
यावेळी कोनेवाडी येथील दौऱ्यात एकाने राजमाता जिजाऊंच्या सोबत गामीणच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर यांची बरोबरी केली आणि राजमाता जिजाऊंसोबत ग्रामीण आमदारांचा एकत्रित करण्यात आलेला फोटो भेटीदाखल दिला.
हा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आणि समस्त शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त झाली. यानंतर संतप्त मराठी भाषिक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोनेवाडी येथील सदर व्यक्तीच्या घरी जाऊन भेट घेत ते छायाचित्र परत करण्याची मागणी केली आहे.
या प्रकारानंतर कोनेवाडी येथे जमलेल्या शिवप्रेमींनी सदर छायाचित्र परत करून उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजां मूर्तीसमोर येऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत पोलीस खात्याला याबाबत सल्ला देण्यात आला आहे. तसे न केल्यास बेळगाव बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.