बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये गेल्या काही दिवसात अनेक अप्रिय घटना घडल्या आहेत. या घटना वैयक्तिक वादातून झाल्या असून याचा संघटनेशी किंवा राष्ट्रीय पक्षांशी कोणताही संबंध नाही. मात्र काहीजणांकडून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी याला धार्मिक रंग देण्यात येत असल्याचा आरोप श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केला.
बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागील पंधरवड्यात हिंदू संघटनेचे नेते रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार झाला होता. याच दरम्यान बेळगावमध्ये हिंदू धर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते. हा गोळीबार या सभेच्या पार्श्वभूमीवर हिंदुविरोधी संघटनांनी केला असल्याचा दावा अनेकांनी केला.
समाजाला वेठीला धरण्यात आले. याबाबत श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनीही या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. हिंदुविरोधी संघटनेने रचलेले हे षडयंत्र असल्याचे प्रमोद मुतालिक म्हणाले. मात्र हे प्रकरण एका वैयक्तिक वादाच्या पार्श्वभूमीवर झाले असून याचा संघ-संस्था-संघटनेशी आणि राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे रमाकांत कोंडुसकर यांनी स्पष्ट केले.
बेळगावमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून अवघ्या २४ तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला. गोळीबार केलेल्या व्यक्तीला अटक केली. सदर घटना हि वैयक्तिक वादामुळे झाली असल्याचे जगजाहीर झाले आहे.
प्रसारमाध्यमांवर देखील हे प्रकरण कोणत्याही राजकीय, धार्मिक वादातून झाले नसून यामागे वैयक्तिक वाद असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, अशा वैयक्तिक वादात कोणत्याही राजकीय संघटनांनी मध्यस्थी न करता समाजात शांतता अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील राहावे. समाजात तेढ निर्माण होऊ नये याचे भान ठेवूनच आपण कोणतेही विधान आपण करावे अशा शब्दात प्रमोद मुतालिकांना कोंडुसकरांनी टोलाही लगावला.