बेळगाव लाईव्ह : म्हादई नदीचे पाणी वळविण्यासंदर्भात कर्नाटकाला दिलेली मान्यता रद्द करण्यासाठी गोवा सरकार पंतप्रधानांना विनंती करणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतीच जाहीर केली.
याबाबत प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, कायदेशीर लढाईनंतर केंद्राने अंतरिम आदेश दिले असून म्हादई योजनेच्या अंमलबजावणीबाबत गोवा सरकारच्या हालचालींसंदर्भात आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.
म्हादई योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारला 2016 मध्ये डीपीआर दिला होता. सध्या डीपीआरलाही मंजुरी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले. हुबळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने म्हादईबाबत भूमिका मांडली आहे.
कायदेशीर संघर्षाच्या रूपरेषेचा आढावा घेऊन हा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. शिवाय सर्वोच्च आदेशानुसार केंद्र सरकारने डीपीआरला परवानगी दिली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.