बेळगाव लाईव्ह : जारकीहोळी व्हर्सेस हेब्बाळकर हे वाकयुद्ध सर्वश्रुत आहे. मात्र आता उभयतांमधील वाद हे राजकीय पातळी सोडून आता वैयक्तिक पातळीवर घसरल्याचे चित्र दिसत आहे.
आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा लक्ष्मी हेब्बाळकरांना लक्ष्य करत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे .
लक्ष्मी हेब्बाळकर यांना ‘विषकन्या’ असे संबोधत पुन्हा एकदा नव्या वादात जारकीहोळींनी उडी घेतली आहे. लक्ष्मी हेब्बाळकरांना उमेदवारी देण्यामागे आपला मोठा हात असून त्यावेळी डीकेशींनी आपल्याला हेब्बाळकरांना उमेदवारी देऊ नका असे ठणकावले होते. लक्ष्मी हेब्बाळकर आणि डीकेशी यांच्यामुळेच काँग्रेस पक्ष बुडाल्याचा आरोपही जारकीहोळींनी केला.
कथित अश्लील सीडी प्रकरणी आपल्याविरोधात डाव रचण्यात आला असून यामध्ये डी. के. शिवकुमार यांचा मोठा हात असल्याचा आरोपही जारकीहोळींनी आज केला आहे.
यासंदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे असून सीडी प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात यावी, अशीही मागणी आपण करणार असल्याचे ते म्हणाले.