बेळगाव हे सध्या 159.65 अब्ज रुपये इतके सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) असलेले राज्यातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. मात्र पूर्वीपासून हे शहर दुर्लक्षित राहिले आहे.
विकास निधीचे वाटप अथवा उद्योग स्थापनेच्या बाबतीत बेळगावला कायम डावलले जाते. आता अलीकडेच रद्द करण्यात आलेल्या बेळगाव विमानतळावरील 12 विमान सेवांमुळे तर या शहराला मोठा फटका बसला आहे. या संदर्भात फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ बेळगावने (एफओएबी) आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे.
विकास निधी व औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत अन्याय होणाऱ्या बेळगावच्या विमानतळावरील मुंबई, दिल्ली या शहरांसह एकूण 12 प्रमुख शहरांच्या विमान सेवा रद्द करण्यात आल्यामुळे त्याचा मोठा परिणाम प्रवासीवर्गावर झाला आहे. याच्या विरुद्ध आवाज उठून संबंधित मंत्र्यांकडे तक्रार करण्यासाठी बेळगावातील विविध संघटनांचा महासंघ असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ बेळगाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस फेडरेशनचे सदस्य असलेल्या 20 हून अधिक व्यापारी आणि औद्योगिक संघटनांच्या प्रमुखांनी हजेरी लावली होती. देशातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या बेळगावच्या विमान सेवा रद्द करण्यात आल्यामुळे त्याचा औद्योगिक क्षेत्राच्या विकासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
खेदाची बाब म्हणजे यापैकी कांही विमानसेवांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असताना त्या बंद करण्यात आल्या आहेत. स्पाइस जेटला नाईलाजाने बेळगाव विमानतळावरील आपल्या सर्व विमानसेवा रद्द कराव्या लागल्या आहेत आणि त्यांची जागा अद्यापही इतर कोणत्याही एअरलाइनने घेतलेली नाही. एका विमान कंपनीकडून बेळगाव -पुणे विमानसेवा सुरू होण्याची शक्यता होती, परंतु ऐनवेळी त्या कंपनीने आपला विचार बदलून दुसरीकडे आपली विमान सेवा सुरू केली. कमी विमान सेवेमुळे प्रवासी संख्या कमी होते आणि प्रवासी संख्या कमी झाली की विमानसेवा कमी होतात. हे एक दुष्टचक्र असले तरी बेळगावच्या क्षमतेकडे कोणीही दुर्लक्ष करून चालणार नाही.
बेळगावातील उद्योगधंदे गेल्या कित्येक वर्षापासून अस्तित्वात असूनही अजूनही ते प्राथमिक प्रारंभीच्या अवस्थेत (स्टार्टअप) असल्याप्रमाणेच आहेत. त्यांची क्षमता अद्यापही कोणी जोखलेली नाही. देशाच्या उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गजांना बेळगावातील संधींची कल्पना नाही आणि ज्यांना याची कल्पना आहे त्यांना या ठिकाणी सुविधांची कमतरता जाणवत असल्याने ते बेळगावात येण्यास तयार नाहीत. यासाठी द फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ बेळगावने येथील उद्योग -व्यवसायांची सर्व समावेशक माहिती आणि मागण्या संबंधित मंत्र्यांसमोर मांडण्याची तयारी सुरू केली आहे जेणेकरून त्यांना योग्य ती कार्यवाही करता येऊ शकेल.
या पद्धतीने बेळगावला आधुनिक व्यापार व्यवसायासाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात आणि बेळगाव हे उद्योग व्यवसायासह राहण्यायोग्य उत्तम शहर बनावे यासाठी द फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ बेळगाव हा एकंदर आता आशेचा किरण बनला आहे.