बेळगाव लाईव्ह : छत्रपती शिवरायांचे चरित्र, आदर्श हे प्रत्येकाने आत्मसात करण्यासारखे आहेत. शिवचरित्र घराघरात आणि मनामनात पोहोचवण्यासाठीच शिवगर्जना हे महानाट्य खानापुरात आयोजित करण्यात आले आहे, असे उदगार महालक्ष्मी ग्रुपचे चेअरमन, भाजप नेते आणि शांती निकेतन पब्लिक स्कूलचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांनी काढले.
विठ्ठलराव हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या आवारात शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ‘बेळगाव लाईव्ह’ने त्यांची खास भेट घेऊन मुलाखत घेतली असता, यावेळी त्यांनी संवाद साधला. छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊनच आपण मोठे झाल्याचे त्यांनी सांगितले. एका ग्रामीण भागात जन्माला आलेला तरुण शिक्षक सहकार महर्षी, शिक्षण महर्षी ही सारी बिरुदावली कशी काय मिळवू शकतो? यावर उत्तर देताना ते म्हणाले, हे सारे छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या श्रद्धेमुळेच साध्य झाले आहे.
दोन रुपयाच्या फंडावरून आज इतके मोठे काम आपण करत आहोत. चारशे कोटींची उलाढाल असलेली सोसायटी असो किंवा भलीमोठी उलाढाल करणारा लैला शुगरचा बंद पडलेला कारखाना सुरू करणे असो. या सर्व गोष्टींसाठी महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि छत्रपती शिवरायांचे आदर्श जपण्याचे कार्य कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व कार्य करत असतानाच राजकीय प्रवासही आपण सुरू केला. मागील वेळी निसटता पराभव आपल्याला झेलावा लागला. मात्र, यावेळी नक्कीच आपण विजयी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खानापुरातील जनतेला छत्रपती शिवराय नवीन नाहीत. शिवराय घरोघरी मूर्ती स्वरूपात पुजले जातात. देव म्हणून पूजले जातात. अशा वातावरणात नवीन पिढीला शिवराय कळावेत, शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचे स्वरूप प्रत्येकाच्या मनामनात रुजावे, हा एकमेव उद्देश या नाटकाच्या आयोजनामागील असल्याचे त्यांनी सांगितले.
हे महानाट्य पाहण्यासाठी दररोज १५००० नागरिक येतील. शिवाय या सर्व नागरिकांची सोयही उत्तमरीत्या करण्यात आली असून खानापूरसह बेळगावमधील प्रत्येकाने या महानाट्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठलराव हलगेकर यांनी केले.