संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये 1956 साली पोलिसांच्या गोळीबारात हौतात्म्य पत्करलेल्या महादेव बारगडी, मारुती बेन्नाळकर, मधु बांदेकर, कमळाबाई मोहिते आदी हुतात्म्यांना सीमावासीय मराठी बांधवांतर्फे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी 17 जानेवारी रोजी शहरातील हुतात्मा चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात 1956 मध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना प्रतिवर्षाप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिक सीमावासियांनी आज 17 जानेवारी रोजी सकाळी शहरातील हुतात्मा चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी सर्वप्रथम मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. त्यानंतर माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी महापौर सरिता पाटील, महिला आघाडीचे अध्यक्ष रेणू किल्लेकर, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल देसाई, नगरसेविका वैशाली भातकांडे, सुधा भातकांडे, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, नेताजी जाधव, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, मदन बामणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर,बापू भडांगे आदींनी हुतात्म्यांच्या, पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे ही घोषणा देण्यात येत होत्या.
प्रारंभी प्रास्ताविकात माजी महापौर मालोजीराव अष्टेकर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची मुद्देसूद तपशीलवार माहिती देताना म्हणाले की, अभिमानाची गोष्ट म्हणजे बेळगावात 1946 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मंजूर करण्यात आला होता. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तो ठराव मांडला होता. बेळगावसह समस्त सीमाभागासहित मुंबई प्रांताचा जो मराठी भाषिक भाग होता त्याचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा ही इच्छा त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती. साहित्य संमेलन झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्र एकीकरण समितीची बेळगावात स्थापना झाली आणि त्या माध्यमातून बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात सामील करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तत्कालीन बेळगाव नगरपालिकेत 24 ऑगस्ट 1948 रोजी समस्त मराठी माणसांचा महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचा ठराव करण्यात आला होता, ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
कर्नाटकातील लोक बेळगावहा कर्नाटकचा विभाज्य भाग होता असे म्हणतात. तेंव्हा कर्नाटकचे राज्यकर्ते अथवा कोणालाही माझा एक प्रश्न आहे, ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी कर्नाटक राज्य कोठे होते? ते त्यांनी नकाशावर दाखवावे. कारण कर्नाटक तेंव्हा अस्तित्वातच नव्हता. कर्नाटकचे चार जिल्हे मुंबई प्रांतात होते, तीन जिल्हे हैदराबाद संस्थानात होते, त्यांचे काही जिल्हे मद्रास प्रांतात होते मग कर्नाटक होते तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित करून खरे तर स्वातंत्र्यानंतर कर्नाटक नव्हे तर म्हैसूर राज्याची निर्मिती झाली होती. त्यानंतर 1973 साली आत्ताचा कर्नाटक निर्माण झाल्याचे अष्टेकर यांनी स्पष्ट केले. पूर्वी धारवाड, बेळगाव, विजापूर आणि कारवार हे जिल्हे मुंबई प्रांतात होते. हे आत्ताच्या कर्नाटकातील नेते व इतरांनी लक्षात घेतले पाहिजे असे सांगून मालोजीराव अष्टेकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांची माहिती दिली.
यावेळी दीपक दळवी यांनी आपल्या समयोचीत भाषणात 1956 च्या संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलनाची माहिती देऊन कशाप्रकारे 17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान हुतात्मा मधु बांदेकर, महादेव बारगडी, लक्ष्मण गावडे यासह अन्य सीमावासीयांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. सीमाप्रश्नाचा लढा सहा दशकांहून अधिक काळ सुरू असला तरी आम्हा मराठी भाषिकांमध्ये अद्यापही पूर्वीची उर्मी व मराठी भाषेचा स्वाभिमान कायम आहे, असे दळवींनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन बामणे यांनी केले. श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमानंतर रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली किर्लोस्कर रोड या मार्गावर श्रद्धांजलीपर फेरी काढण्यात आली. या फेरी दरम्यान हुतात्म्यांच्या जयजयकाराच्या घोषणांसह बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, बेळगाव -कारवार -निपाणी -बिदर -भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आदी घोषणा देण्यातच होत्या. यावेळी डोक्यावर हुतात्मा दिना संदर्भातील मजकूर लिहिलेल्या सफेद गांधी टोप्या परिधान केलेले पुरुष व महिला कार्यकर्ते साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. या फेरीत मराठी भाषिक सीमाबांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते.
बेळगाव शहरातील आजच्या हुतात्मा दिन कार्यक्रमास सीमाप्रश्नी तज्ञ समितीचे अध्यक्ष व हातकणंगलेचे आमदार धैर्यशील माने येणार होते. मात्र काल सोमवारी रात्री कर्नाटक पोलिसांनी त्यांना बेळगावातील प्रवेश बंदीची नोटीस बजावल्यामुळे आजच्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रमास आमदार माने हजेरी लावू शकले नाहीत.