हेल्प फॉर निडी या बेळगावच्या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली.
कोल्हापूर मध्ये झालेल्या या भेटीत 2017 पासून हेल्प फॉर नीडी या संघटनेच्या माध्यमातून बेळगाव सह सीमाभागात राबवण्यात आलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.
आगामी काळात बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात युवा वर्ग आणि महिलांसाठी विविध योजना राबवण्याची गरज यावेळी अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडले आहे.
बेळगाव ग्रामीण भागात महिलांसाठी रोजगारच्या शासकीय योजना फक्त कन्नड भाषेत असल्याने मराठी भाषिकांचा त्रास होत आहे त्यामुळे मराठी भाषेमध्ये ग्रामीण भागातील महिलासाठी शिवण क्लास व इतर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावीत त्यासाठी खाजगी क्लासेस महाराष्ट्राकडून अनुदान देण्यात यावे अशी मागणी यावेळी अनगोळकर यांनी केली.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महिला आणि युवकांसाठी प्रशिक्षण शिबिरे तसेच इतर उपक्रम राबवले जावेत. अशी मागणी यावेळी करण्यात आली असून त्याला शरद पवार यांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हेल्प फॉर निडी च्या प्रेमा पाटील उपस्थित होत्या.
खानापूर तालुका समितीचे आबासाहेब दळवी यांनी यावेळी आगामी निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा केली त्यावेळी शरद पवार यांनी आपण कर्नाटकात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले.