राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ बेंगलोरशी संलग्न असलेल्या मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या नाथाजीराव जी. हलगेकर इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च सेंटर बेळगावचा पदवीदान सोहळा काल शुक्रवारी दिमाखात पार पडला.
कॉलेजच्या सभागृहात पार पडलेल्या या पदवीदान सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून आयसीएमआर -एनआयटीएम बेळगावच्या संचालिका डॉ सुबर्णा रॉय यांच्यासह सन्माननीय अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य नागराजू यादव उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. रमाकांत नायक यांनी सर्वांचे स्वागत केले. उपप्राचार्या डॉ. प्रीती कसुगल यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
डॉ. अभिजीत पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर दंतविज्ञान शाखेची पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा शपथविधी झाला. यावेळी कॉलेजच्या प्रशासकीय प्रमुख डॉ. पुष्पा पुडकलकट्टी व डॉ. वीरेंद्र उप्पीन हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. सदर सोहळ्यात पदवी प्राप्त एकूण 26 विद्यार्थी -विद्यार्थिनींना स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
प्रमुख पाहुण्या डॉ सुबर्णा रॉय यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्त्व पटवून दिले. संशोधनाच्या मदतीने जीवनातील आव्हानांना तोंड देता येऊ शकते असे सांगितले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी क्लिनिकल संशोधनामध्ये अधिक रस घेऊन देशाच्या उज्वल भवितव्यासाठी हातभार लावावा, असे आवाहनही रॉय यांनी केले. यावेळी नागराजु यादव यांनी देखील आपले समयोचित विचार व्यक्त करून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पदवीदान समारंभाचे औचित्य साधून पाहुण्यांच्या हस्ते ‘बेस्ट आउट गोइंग स्टुडन्ट’ हा पुरस्कार पाच वर्षाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल डाॅ. रूचा मुतालिक आणि डॉ. प्रथमेश शेटे यांना विभागून देण्यात आला.
या खेरीज विद्यापीठाच्या दरवर्षीच्या दंतविज्ञान पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल डाॅ. रूचा मुतालिक यांना ‘अकॅडमिक टॉपर अवार्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. पदवीदान सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. विप्लवी पाटील आणि डॉ. दिपाली गुरव यांनी केले. शेवटी डॉ साई चांदणी यांनी सर्वांचे आभार मानले.