बेळगाव लाईव्ह : हलगा – मच्छे बायपास प्रकरणी बेकायदेशीर रित्या कामकाज सुरु करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देणे शिवाय याप्रकरणी उच्च न्यायालयाने स्थगितीचा आदेश देऊनही बळजबरीने उभ्या पिकात जेसीबी फिरवून बायपासचे काम सुरू करण्यात आले.
याप्रकरणी ऍड. रविकुमार गोकाककर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे बाजू मांडत हलगा-मच्छे बायपास प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेला बळकटी आणून दिली. उच्च न्यायालयाचे आदेश डावलून बायपास प्रकरणी काम सुरू केल्याने न्यायालयाचा अवमान करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीनुसार कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात न्यायमूर्ती एन. एस. संजयगौडा यांनी सुनावणी केली असून न्यायालयाचा आदेश डावलून आज्ञाभंग आणि अवमान केल्या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, उपायुक्त, भूसंपादन अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त, तसेच पोलीस अधीक्षकांना नोटिसी बजावण्यात आल्या आहेत.
महामार्ग प्राधिकरणाने तक्रार क्रमांक १०००१३/२०२२ नुसार सीआरपी याचिका दाखल केली होती. मात्र कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. हलगा-मच्छे बायपास प्रकरणी शेतकऱ्यांच्या मालमत्ता परत करणे, पिकांची संपूर्ण नुकसान भरपाई देणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, उपायुक्त, भूसंपादन अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त, तसेच पोलीस अधीक्षकांना तुरुंगात पाठविण्यात यावे, अशा मागण्या याचिका क्रमांक १०-१८-१४ या याचिकेत करण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस काम करून उभ्या केलेल्या पिकात, न्यायालयाचा आदेश डावलून जेसीबी फिरवण्यात आला.
याप्रकरणी शेतकऱ्यांच्या बाजूने ऍड. रवीकुमार गोकाककर यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, उपायुक्त, भूसंपादन अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त, तसेच पोलीस अधीक्षकांना नोटिसी बजाविण्यात आल्या आहेत.