गुलमोहर बाग या बेळगावच्या चित्रकला कलाकार संघातर्फे येत्या रविवार दि. 22 ते गुरुवार दि. 26 जानेवारी 2023 या कालावधीत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ‘प्रयास’ या पेंटिंग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
टिळकवाडीतील हेरवाडकर हायस्कूल जवळील वरेकर नाट्य संघाच्या कला महर्षी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सलग पाच दिवस आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन येत्या रविवारी 22 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता प्रमुख पाहुणे शरद तरडे, जयंत हुबळी व पार्श्वनाथ नांद्रे यांच्या हस्ते होणार आहे.
‘प्रयास’ या पेंटिंग प्रदर्शनामध्ये गुलमोहर बाग कलाकार संघातील अजित हुलमणी, अंजली पवार, आशा राणे, शिवाजी बेकवाडकर, स्नेहा कंग्राळकर, चंद्रकला करगांवकर, हिमांगी प्रभू, सचिन उपाध्ये, महेश सोनुले,
वृषाली मराठे, वाणी हिरेमठ, शिरीष देशपांडे, सुरेंद्र पाटणेकर, पूजा जाधव, प्रवीणकुमार अंगडी, सुषमा पाटणेकर आदी 34 चित्रकार सदस्यांची पेंटिंग्स मांडली जाणार आहेत. याखेरीज प्रदर्शनाच्या पाचही दिवशी दररोज सायंकाळी 4 वाजता अनुक्रमे शिवाजी बेकवाडकर (वॉटर कलर),
अंजली पवार (अॅक्रिलिक), स्नेहा कंग्राळकर (रिलीफ आर्ट) आणि सचिन उपाध्ये (चारकोल्स) यांची पेंटिंगची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. तरी कलाप्रेमींनी या प्रदर्शनाला बहुसंख्येने भेट देऊन कलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.