राज्यातील सर्व हॉस्पिटल्समध्ये ऑटो आणि कॅब चालकांसाठी आयुष्यमान भारत आरोग्य योजनेअंतर्गत मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्यात आले असून अपघाती मृत्यू अथवा जखमी झाल्यास भरपाई आणि वैद्यकीय उपचार खर्चाची तरतूदही करण्यात आली आहे.
कर्नाटक सरकारतर्फे 2011 -12 साली राज्यामध्ये कर्नाटक राज्य खाजगी व्यावसायिक वाहन चालक अपघात नुकसान भरपाई योजना या नावे विमा योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 2016 -17 मध्ये सुधारित कर्नाटक राज्य व्यावसायिक वाहतूक विमा योजना सुरू झाली.
आता वाहनचालकांसह देखभाल करणारे आणि क्लिनर यांच्यासाठी विमा सुरक्षा योजनेचा विस्तार करून कामगार अपघात नुकसान भरपाई योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास संबंधिताच्या कुटुंबाला 5 लाख रुपये भरपाई मिळते, तर अपघातात जखमी किंवा कायम स्वरूपी अपंगत्व प्रकरणात लाभार्थीला 5 लाख रुपये आणि वैद्यकीय उपचारासाठी 1 लाख रुपयांपर्यंत मदत मिळते.
एकंदर अपघातात ऑटोचालक किंवा कॅब चालक जखमी झाल्यास त्यांना कोणत्याही रुग्णालयामधून मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. मात्र त्यासाठी आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे लाभार्थी असणे जरुरीचे आहे. दरम्यान कोरोना काळात लाॅक डाऊन होता. त्या काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रसंगी 5000 व 3000 रुपयांची आर्थिक मदत अनुक्रमे ऑटो व कॅब चालकांना देण्यात आली होती.
अनेकांनी या संदर्भात भरपाई ऐवजी भाडे माफ केले जावे अथवा घरकुल योजना हाती घ्यावी अशी मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देऊन घरकुल योजनेचा प्रस्ताव हाती घेण्यात आला असून त्याला मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.