बेळगाव लाईव्ह : कोल्हापूरच्या धर्तीवर बेळगावात गोवऱ्यांवर मोफत अंत्यसंस्कार योजना राबविण्याच्या निर्णयानुसार बेळगाव महानगरपालिकेने अखेर हि योजना कार्यान्वित केली आहे. शहापूर स्मशानभूमीत शुक्रवारपासून गोवऱ्यांवरील अंत्यसंस्काराला सुरुवात झाली असून उर्वरित स्मशानभूमीमध्येही या योजनेची अंमलबजावणी लवकरच होणार आहे, अशी माहिती मनपा आरोग्याधिकारी डॉ. संजय डूमगोळ यांनी दिली.
गोवऱ्यांवरील मोफत अंत्यसंस्कार योजनेचा निर्णय महापालिकेने फेब्रुवारी २०२१ मध्ये घेतला होता. २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी ५० लाखांचा निधी राखीव ठेवण्यात आला, पण योजना प्रत्यक्षात सुरू झाली नव्हती. आमदार अभय पाटील, आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी व आरोग्याधिकारी डॉ. संजय डूमगोळ यांनी एप्रिल २०२२ मध्ये गोवऱ्यांवरील मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी शहापूर स्मशानभूमीची पाहणी केली होती.
पाहणीनंतर महिनाभरात योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला, मात्र गोवऱ्या ठेवण्यासाठी आवश्यक शेडची अनुपलब्धता गोवऱ्यांचा तुटवडा, यामुळे सदर योजनेची अंमलबजावणी झाली नव्हती.
पुढील टप्प्यात खासबाग, वडगाव व चिदंबरनगर येथील स्मशानभूमीतही ही योजना राबविली जाणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या या योजनेची चर्चा सुरू झाल्यामुळे २०२२-२३ सालात या योजनेसाठी पुन्हा ५० लाखांचा निधी राखीव ठेवण्यात आला. यो
जनेच्या अंमलबजावणीसाठी एका सेवाभावी संस्थेची नियुक्तीही पालिकेकडून करण्यात आली आहे. आवश्यक गोवऱ्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्या संस्थेकडे असणार आहे.
शहर उत्तर विभागातील सदाशिवनगर स्मशानभूमी आणि दक्षिण विभागातील शहापूर स्मशानभूमीत गोवऱ्यांवर मोफत अंत्यसंस्कार करण्याची योजना महापालिकेने हाती घेतली असून पहिल्या टप्प्यात या दोन स्मशानभूमींमध्ये ही योजना राबविली जाणार आहे. सदाशिवनगर स्मशानभूमीत चार महिन्यांपूर्वीच योजनेचा शुभारंभ झाला आहे, पण शहापूर स्मशानभूमीत हि योजना सुरु करण्यात आली नव्हती.
चार दिवसांपूर्वी पालिका आयुक्तानी पुन्हा एकदा स्मशानभूमीला भेट देऊन योजना सुरू करण्याची सूचना दिली. त्यानुसार शुक्रवारी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.