बेळगाव लाईव्ह : कोरोना काळापासून केंद्र आणि राज्य सरकारकडून गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या रेशनमध्ये जानेवारी महिन्यापासून कपात करण्यात आली आहे. यामुळे प्रतिव्यक्ती १० ऐवजी ५ किलो तांदूळ वितरित करण्यात येणार आहेत. यापुढे आता लाभार्थ्यांना दर महिन्याला ५ किलो तांदूळ दिला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून वाढीव रेशनचा पुरवठा केला जात होता. केंद्र सरकारकडून ५ किलोआणि राज्य सरकारकडून ५ किलो असा एकूण १० किलो तांदूळ रेशनदुकानातून दिला जात होता. मात्र, नवीन वर्षात रेशनच्या वितरणात कपात करण्यात आली आहे.
सध्या केंद्र सरकारकडून राज्य सरकारला होणारा धान्याचा पुरवठा बंद झाला असल्यामुळे लाभार्थ्यांना १० ऐवजी ५ किलो तांदूळ वितरित केला जात आहे. जानेवारी महिन्यात लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ किलो तर फेब्रुवारी महिन्यात ७ किलो आणि त्यापुढे केवळ ६ किलो तांदूळ वाटप केला जाणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान रेशनमधून मिळणारे तांदूळ मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्री होत असल्याचेही निदर्शनात आले होते. रेशन दुकानात मोफत मिळणारा तांदूळ १० ते १२ रुपये प्रतिकिलोने काळ्या बाजारात विक्री केला जात होता. गेल्या २ वर्षांपासून वाढीव धान्याचा पुरवठा केला जात होता. मात्र आता शासनाने यात बदल करून धान्य पुरवठ्यात कपात केली आहे.
केंद्र सरकारने राज्य सरकारला मोफत रेशनचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय १० किलो तांदळावरून ६ किलो तांदूळ वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना आता ६ किलो तांदळावर समाधान मानावे लागणारअसून काळ्या बाजाराला देखील आळा बसणार आहे.