बलाढ्य मोहन मोरे इलेव्हन आणि झेन स्पोर्ट्स मुंबई या दोन तुल्यबळ संघांमध्ये अनिल बेनके स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अजिंक्यपदासाठी उद्या बुधवार दि. 18 जानेवारी रोजी अंतिम लढत होणार आहे.
सरदार्स मैदानावर सदर स्पर्धेचा अंधुक प्रकाशामुळे काल सोमवारी सायंकाळी अर्धवट राहिलेला झेन स्पोर्ट्स मुंबई विरुद्ध के. आर. शेट्टी किंग्स हा कालचा अर्धवट राहिलेला सामना आज पुढे खेळण्यात आला. या सामन्यात झेन स्पोर्ट्सने विजय मिळवत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर आज झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात मोहन मोरे इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धी साईराज वॉरियर्स संघावर 4 गडी राखून विजय संपादन केला. मोरे इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून साईराज वॉरिअर्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले.
साईराजने मर्यादित 12 षटकात 8 गडी बाद 132 धावा काढल्या. प्रतिउत्तरा दाखल मोहन मोरे इलेव्हन संघाने 6 बाद 133 धावा काढून सामना जिंकला. विजेत्या मोरे इलेव्हन संघातर्फे ओमकार देसाई (18 चेंडूत 46 धावा) आणि कृष्णा गवळी (11 चेंडूत 27 धावा) यांनी तडाखेबंद फलंदाजीचे प्रदर्शन केले. तर गोलंदाजीत प्रज्योत आंब्रे याने 26 धावात 4 गडी बाद केले. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ओमकार देसाई मोरे इलेव्हन हा ठरला.
स्पर्धेच्या आज झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात झेन स्पोर्ट्स मुंबई संघाने प्रतिस्पर्धी एसआरएसएच जीजी बॉईज संघाला 5 गडी राखून पराभूत केले. नाणेफेक जिंकून झेन स्पोर्ट्सने क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना एसआरएसएच जीजी बॉईज संघाने 11.4 षटकात सर्व गडी बाद 105 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल झेन स्पोर्ट्स संघाने 10.5 षटकात पाच गडी बाद 106 धावा काढून अंतिम फेरी गाठली. विजेत्या झेन स्पोर्ट्स संघातर्फे मुन्ना शेख (20 चेंडूत 27 धावा), अश्रफ खान (8 चेंडूत 26 धावा) व शाहिद शेख (11 चेंडूत 13 धावा) यांनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याचप्रमाणे त्यांच्या बिलाल शेख (ज्यु.) (24/4), वमिक (22/3) व इम्रान (41/2) यांनी भेदक गोलंदाजी केली. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी बिलाल शेख (ज्यु.) हा ठरला.
आता उद्या बुधवार दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. मोहन मोरे इलेव्हन आणि झेन स्पोर्ट्स मुंबई यांच्यात अंतिम सामना खेळविला जाणार आहे. या दोन्ही तुल्यबळ संघात मुंबईच्या खेळाडूंचा भरणा असल्यामुळे उद्याचा अंतिम सामना अतिशय रंगतदार चुरशीचा होणार असून दोघांपैकी कोण जिंकणार? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.