Tuesday, January 21, 2025

/

ग्रामीण मध्ये शक्तिप्रदर्शनातून प्रकट होतेय प्रबळ इच्छा!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच निवडणुकीच्या दृष्टिकोनातून इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. बेळगाव भाजपच्या ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्यापरीने पूर्ण क्षमतेने तयारी सुरु केली असून या ना त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. या शक्तिप्रदर्शनातून इच्छुकांची उमेदवारीसाठी प्रबळ इच्छा असल्याचे जाहीर होत आहे.

भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव, हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर आणि माजी आमदार संजय पाटील यांच्यात उमेदवारीसाठी चुरस रंगल्याचे चित्र गेल्या पंधरवड्यात स्पष्ट झाले आहे.

मागील आठवड्यात नागेश मन्नोळकर यांनी  जोरदार शक्ती प्रदर्शन करत जन संपर्क केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांच्याहस्ते कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमास हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यातच जारकीहोळी विरुद्ध विद्यमान ग्रामीण आमदार यांच्यातील संघर्ष यामुळे भाजपने ही रणनीती आखली असल्याची चर्चाही सुरु होती. याचदरम्यान धनंजय जाधव यांच्या कार्यालयाला माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी भेट दिली त्यांनीही एका शक्ती प्रदर्शन करत बैठकीचे आयोजन केले. यामुळे ग्रामीण मतदार संघातून धनंजय जाधव आणि नागेश मन्नोळकर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली.

रविवारी माजी आमदार संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदवाडी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. यावेळी हजारोंच्या संख्येने महिला वर्गाला आमंत्रित करण्यात आले होते. जमलेली गर्दी पाहता हे शक्तिप्रदर्शनच असल्याचे प्रत्येकाच्या लक्षात आले. यावेळी संजय पाटील यांनी जाहीरपणे विद्यमान ग्रामीण आमदारांना खुले आव्हान देत आगामी विधानसभा निवडणुकीत ग्रामीण मतदार संघातून कुक्करची शिट्टी वाजणार नसल्याचे सांगितले.

ज्यापद्धतीने कुक्कर वाटप झाले त्याच धर्तीवर या कार्यक्रमात देखील ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवत भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. यावरून विद्यमान आमदारांना जेरीस आणण्यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करत आहे.Rural

याव्यतिरिक्त काँग्रेस आणि भाजपाला धूळ चारण्यासाठी समिती नेतृत्व देखील पुढारले असून समिती उमेदवार जनसंपर्क लॉबिंग करण्यात व्यस्त आहेत. जनसंपर्क अभियान, रिंग रोड संदर्भातील आंदोलन, महामेळाव्यानंतर समितीने पुकारलेला एल्गार राष्ट्रीय पक्षांसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी चपराक ठरणार आहे.

एकीकडे काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना भुईसपाट करण्यासाठी भाजपाची सुरु असलेली चढाओढ आणि दोन्ही राष्ट्रीय पक्षांना धूळ चारून पुन्हा समितीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी समिती नेत्यांनी कसलेली कंबर यामुळे ग्रामीण मतदार संघात सर्वाधिक ताकद आजमावली जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.