येत्या 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याबरोबरच सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी महाराष्ट्राने जे शक्य आहे ते करावे, सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी केंद्राच्या मदतीने कर्नाटक सरकारवर दबाव आणावा यासाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी ‘चलो मुंबई’ आंदोलन छेडण्याचा निर्णय मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक आज शुक्रवारी दुपारी रेल्वे ओव्हर ब्रिज खानापूर रोड येथील मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीनंतर माजी आमदार किणेकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, दरवर्षी 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जातो. तसा तो यंदाही गांभीर्याने पाळून हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे.
ज्याप्रमाणे घटक समित्या आपापल्या भागात हा हुतात्मा दिनाचा कार्यक्रम करतात. त्याप्रमाणे त्यांनी यंदाही तो करावा अशी सूचना करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यात खानापूर येथे, बेळगाव तालुक्यात कंग्राळी खुर्द गावामध्ये आणि बेळगाव शहरात हुतात्मा चौक येथे हा कार्यक्रम होतो. त्यानुसार 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.
याबरोबरच सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील सर्व पक्षीयांना जागे करण्यासाठी, त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाच्या दाव्याबद्दल जास्त सतर्क रहावे यासाठी, तसेच परवा ‘चलो कोल्हापूर’ आंदोलनावेळी महाराष्ट्र बंदची हाक देण्याबाबत विनंती केली होती. त्याबद्दल कोणतीही हालचाल झाली नसल्याबद्दल येत्या 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘चलो मुंबई’ आंदोलन छेडून आम्ही धडक मोर्चाने मुंबईला जाणार आहोत. तेथील आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन केले जाईल. एकंदर सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्राने जे शक्य आहे ते करावे अशी विनंती आम्ही या आंदोलनाद्वारे करणार आहोत.
तसेच कर्नाटक सरकार बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांवर करत असलेला अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी केंद्राच्या मदतीने कर्नाटकात दबाव आणावा अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत, अशी माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली. याप्रसंगी मध्यवर्तीय म. ए. समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, समितीचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी आदी उपस्थित होते.
दरम्यान, हुतात्मा दिनी 17 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर मिरवणूक काढण्यात येणार असून ही मिरवणूक रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे पुन्हा हुतात्मा चौक येथे समाप्त होईल.