कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चार जागा जिंकून येणे महत्त्वाचे आहे त्यासाठी महाराष्ट्राचे राज्यसभा सदस्य संजय राऊत, आमदार जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांची सीमा भागासाठी नियुक्ती करावी, अशी मागणी म. ए. समितीच्या माजी जिल्हा पंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
बेळगावचे माजी जि. पं. सदस्य रामचंद्रराव मोदगेकर यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या माजी जि. पं. सदस्यांच्या शिष्टमंडळाने गेल्या शनिवारी कोल्हापूर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.
यापूर्वी सीमा लढ्याचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सीमा लढा ज्वलंत राहिला आहे. त्यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची उणीव सीमावासियांना भासत आहे. सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागत आहे. मात्र यावेळी किमान चार मतदार संघात समितीचे उमेदवार जिंकणे आवश्यक आहे.
यासाठी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील किमान दोन नेत्यांची सीमाभागासाठी नियुक्ती केली जावी. ज्यामध्ये राज्यसभा सदस्य संजय राऊत, आमदार जयंत पाटील अथवा आमदार रोहित पाटील यांचा समावेश असावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी समितीचे माजी जि. पं. सदस्य रामचंद्र मोदगेकर यांच्यासह नगरसेवक शिवाजी मंडोळकर, माजी जि. पं. सदस्य शिवाजी शिंदे, युवा आघाडीचे किरण मोदगेकर आदी उपस्थित होते.