सेवानिवृत्त माजी सैनिकांसाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावतर्फे येत्या 1 व 2 फेब्रुवारी 2023 रोजी डिफेन्स सर्व्हिस कोर्प्ससाठी (डीएससी) मराठा सेंटर येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोल्जर जनरल ड्युटी (जीडी) व सोल्जर क्लार्क पदासाठी ही भरती होणार असून भरती मेळाव्यात केवळ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल मधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक भाग घेऊ शकतात. सोल्जर जीडी पदासाठी वय वर्ष 46 खालील तर लिपिक पदासाठी 48 वर्षाखालील उमेदवार पात्र असणार आहेत. उमेदवारांनी सैन्यात किमान 5 वर्षे सेवा बजावलेली असावी.
तसेच त्याचा निवृत्ती कालावधी हा गेल्या दोन वर्षातील असावा निवृत्ती पूर्वीच्या तीन वर्षाच्या कालावधीत उमेदवाराच्या सेवा पुस्तकात एकही लाल शाईचा शेरा नसावा. तसेच संपूर्ण सेवा काळात त्याच्यावर दोनपेक्षा अधिक लाल शाईचे शेरे नसावेत.
डीएससी मेळाव्याला उपस्थित राहताना माजी सैनिकांनी आपल्या सोबत आपले मूळ सेवा पुस्तक, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, डीमिसाईल प्रमाणपत्र, गाव सरपंच किंवा पोलीस पाटील यांच्याकडून मिळविलेला वर्तणुकीचा दाखला तसेच आपल्या कुटुंबासमवेत फोटो काढून त्यावर कुटुंबातील सदस्यांची नावे, नाते जन्मतारीख आदी माहिती लिहून त्यावर सरपंचाची सही आणि शिक्का घ्यावा.
याखेरीज आर्मी ग्रुप इन्शुरन्स प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे स्वतःचे 15 रंगीत फोटो, जिल्हा पोलीस प्रमुखांकडून मिळालेले व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट व सर्व प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतींसह भरतीच्या दिवशी भरतीच्या ठिकाणी सकाळी 7 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.