विभागीय रेल्वे व्यवस्थापकाकडून रेल्वे मार्ग तपासणीचे काम सुरू असल्यामुळे तिरुपती -कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वे तब्बल तासभर पाच्छापूर रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन संतप्त प्रतिक्रिया उमटल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली.
रेल्वे क्र. 17415 तिरुपती -कोल्हापूर ही एक्सप्रेस रेल्वे आज सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावरून कोल्हापूरकडे निघाल्यानंतर पाच्छापूर रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी ही रेल्वे थांबवून ठेवण्यात आली. तासभर होत आला रेल्वे पुढे मार्गस्थ होत नसल्यामुळे रेल्वेतील प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली.
चौकशीअंती नैऋत्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडून (डीआरएम) पुढे रेल्वे मार्गाची तपासणी सुरू असल्यामुळे आपली रेल्वे रोखण्यात आली असल्याचे प्रवाशांना समजले. अखेर तासभरानंतर सदर रेल्वे कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
सुरक्षित रेल्वे वाहतुकीसाठी रेल्वे मार्गांची वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे असते. ही तपासणी जरूर करावी मात्र त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांना त्रास होणार नाही. त्यांना वेठीस धरले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तिरुपती सारख्या लांबून येणाऱ्या प्रवाशांना केंव्हा एकदा आपल्या इच्छित स्थळी पोहोचतो असे झालेले असते.
बरेच जण महत्त्वाच्या कामासाठी एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहोचता यावे याकरिता ठराविक रेल्वेने प्रवासाला निघालेले असतात. महत्त्वाचे काम न झाल्यास त्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर आज सकाळी तासभर पाच्छापूर रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी ताटकळावे लागल्यामुळे सर्वच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. खरे तर तिरुपती -कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वेला आडकाठीनंतर प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन डीआरएमना आपले काम अल्पावधीसाठी थांबवता आले असते. मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही आणि प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.
रेल्वे खात्यातील वरिष्ठांकडून प्रवासी सेवेच्या बाबतीत थोडी जरी चूकभूल झाली तर रेल्वे चालक, तिकीट तपासणी, स्टेशन मास्तर वगैरे सारख्यांना धारेवर धरून जाब विचारला जातो. मात्र आज खुद्द विभागीय रेल्वे व्यवस्थापकांमुळे लांब पल्ल्याच्या एका रेल्वेला आणि त्यातील शेकडो प्रवाशांना तब्बल तासभर पाच्छापूर रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी अडकून पडावे लागले. या प्रकारामुळे प्रवाशांना झालेला मनस्ताप आणि नुकसान याला जबाबदार कोण? स्वतःच्या कामासाठी प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या या डीआरएमना जाब विचारणारे कोणी नाहीत का? असा संतप्त सवाल केला जात आहे.