बेळगाव लाईव्ह : श्री क्षेत्र सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी मंदिराच्या दानपेटीत गेल्या महिनाभरात देणगी स्वरूपात तब्बल 1 कोटी 10 लाख 39 हजार रुपये देणगी जमा झाली आहे.
बुधवारी आणि गुरुवारी मंदिरातील दानपेटीत आलेल्या देणगीची मोजदाद करण्यात आल्यानंतर हि सदर माहिती देण्यात आली आहे.
श्री रेणुकादेवीच्या देणगीपेटीत पंधरा लाख रुपयांची रोख देणगी जमा झाली आहे. यासह सहा लाख 66 हजार रुपये किमतीचे 119 ग्रॅम सोने, आठ लाख 74 हजार 965 ग्रॅम चांदी देणगी स्वरूपात मिळाली आहे. मंदिरात देणगी स्वरूपात आलेल्या साहित्याची 50 टक्के मोजदाद पूर्ण झाली असून उर्वरित काम पुढील आठवड्यात केले जाणार आहे, अशी माहिती मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी बसवराज जिरग्याळ यांनी दिली.
देवस्थान व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मंदिराचे कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी, धर्मादाय खाते, तहसीलदार आणि सौंदत्ती पोलिसांच्या उपस्थितीत मंदिरातील दानपेटी उघडण्यात आल्या. देणगी स्वरूपात मिळालेल्या रकमेतून सौंदत्ती डोंगरावर पिण्याचे पाणी, रस्ते, पथदीप इतर विकास कार्य हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष बसय्या हिरेमठ यांनी दिली.
यावेळी मंदिराचे अधीक्षक अरविंद मेलगे, सदस्य वाय. वाय. कल्लपनावर, कल्लाप्पगौडा गंदीगवाड, लक्ष्मी हुली, संतोष सिरसंगी, डी. आर. चव्हाण, एम. एस. यलीगार, एम. पी. ध्यामनगौडर आदी उपस्थित होते.