अलारवाड क्रॉस नजीक असलेल्या यडवाल शिवारातील बैलगाड्यांसाठी असलेल्या कच्च्या रस्त्याचे डांबरीकरण अथवा सिमेंट कॉंक्रिटीकरण करावे, अशी मागणी या शिवारात शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्याकडे केली आहे.
यडवाल शिवारात शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनी आज सोमवारी सकाळी सरदार मैदानावर आमदार ॲड. अनिल बेनके यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.
अलारवाड क्रॉस नजीक असलेल्या यडवाल शिवारात ऊस भात, भाजीपाला वगैरे कृषी उत्पादनांची वाहतूक करण्याच्या दृष्टीने बैलगाड्यांच्या वर्दळीसाठी फार पूर्वीपासून एक कच्चा रस्ता आहे. मात्र पावसाळ्यात सुमारे 2 -2.5 कि. मी. अंतराच्या या रस्त्याची पार दुरवस्था होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना या रस्त्यावरून आपल्या बैलगाड्या हाकताना मोठा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यामधून नाला गेला आहे.
अलीकडे नाल्याच्या ठिकाणी रस्त्याखाली घालण्यात आलेला पाईप देखील फुटला आहे. त्यामुळे रस्ता खचून शेतकऱ्यांच्या त्रासामध्ये अधिकच भर पडली आहे. तेंव्हा कृपया नाल्याच्या ठिकाणी नवा पाईप घालण्याबरोबरच यडवाल शिवारातील कच्चा रस्त्याच्या जागी डांबरी किंवा सिमेंट काँक्रीटचा शाश्वत पक्का रस्ता बांधण्यात यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदनाचा स्वीकार करून आमदार ॲड. अनिल बेनके यांनी उद्या मंगळवारी सायंकाळी 4 वाजता आपण यडवाल शिवारातील त्या कच्च्या रस्त्याची पाहणी करण्याचे आणि त्यानंतर लवकरात लवकर त्याचे बांधकाम करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी नगरसेवक रवी साळुंखे, माणिक शंकरगौडा, पायू शंकरगौडा, महावीर जनगौडा, इंद्राचरण जनगौडा, भरत संकन्नावर, राजू संकन्नावर, बसू संकन्नावर, बाळू पाटील, लक्ष्मण शिंदे, सतीश शिंदे, परशराम भागोजी, बाळू हुद्दार, सुनील माळवी, मुकेश धामणकर, विश्वनाथ पाटील, संतोष संकन्नावर, राजू जनगौडा, महावीर अनोजी, अनिल माळवी, रघु पाटील आदींसह बेळगाव, शहापूर व अलारवाड परिसरातील शेतकरी उपस्थित होते.