Wednesday, January 22, 2025

/

मराठी भाषिकांसाठी ‘केएलई’मध्ये उपलब्ध होणार म. फुले योजना

 belgaum

महाराष्ट्र सरकारच्यावतीने सीमा भागात लागू झालेल्या महात्मा फुले आरोग्य योजनेचा केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या माध्यमातून बेळगावसह सीमा भागातील मराठी जनतेला लाभ व्हावा यासंदर्भात महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री व सीमा समन्वयक मंत्री दीपकभाई केसरकर आणि केएलई संस्थेचे अध्यक्ष डाॅ. प्रभाकर कोरे यांच्यात नुकतीच सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेअंती सीमावासियांसाठी लवकरात लवकर केएलई हॉस्पिटलमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने महात्मा फुले आरोग्य योजना सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी लागू करण्यात आली आहे. महात्मा फुले योजनेअंतर्गत सीमाभागातील मराठी भाषिकांना देखील निशुल्क अथवा सवलतीच्या दरात आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासंदर्भात सीमाभाग समन्वय मंत्री दीपकभाई केसरकर यांनी काल सोमवारी केएलई संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रभाकर कोरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

याप्रसंगी बेळगाव वारकरी संघाचे अध्यक्ष ह.भ.प. शंकर बाबली महाराज, माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर आणि मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर उपस्थित होते. यावेळी बोलताना ह.भ.प. शंकर बाबली महाराज यांनी वडगाव येथील केएलई चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी सरकारच्या कोणत्याही योजना अथवा सुविधा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच शहापूर, वडगाव, जुने बेळगाव खासबागसह बेळगावच्या दक्षिणेकडील येळ्ळूर, धामणे वगैरे ग्रामीण भागातील 80 टक्के जनता ही मराठी भाषिक आहे. त्यांच्यासाठी केएलई डॉ प्रभाकर कोरे हॉस्पिटल दूर पडते. यासाठी महात्मा फुले आरोग्य योजना वडगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये देखील उपलब्ध करावी अशी विनंती त्यांनी केली.

केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये सीमाभागालगच्या चंदगड तालुक्यातील लोकांसाठी महात्मा फुले आरोग्य योजना उपलब्ध आहे. मात्र बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी ती सुविधा उपलब्ध नाही. यासंदर्भात सीमा समन्वय मंत्री दीपक भाई केसरकर आणि डॉ प्रभाकर कोरे यांच्यात कालच्या भेटीप्रसंगी महत्त्वपूर्ण चर्चा झाली.Kore

या चर्चेअंती महाराष्ट्र शासन जर सहकार्य करणार असेल तर आपण सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले आरोग्य योजना राबविण्यास केंव्हाही तयार आहोत, असे डॉ कोरे यांनी स्पष्ट केले. तसेच या संदर्भात आपण लवकरच मुंबईला जाऊन संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर योजना केएलई हॉस्पिटलमध्ये सीमावासीय मराठी बांधवांसाठी सुरू करू, असे आश्वासन डाॅ. प्रभाकर कोरे यांनी दिले.

मंत्री केसरकर आणि डॉ. कोरे यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी आता केएलई डाॅ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये खास कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी सीमावासीय मराठी बांधवांनी या दोन कर्मचाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रामुख्याने किमान 15 वर्षे बेळगावात स्थायिक असल्याचा तहसीलदारांच्या स्वाक्षरीचा दाखला आवश्यक असणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.