राहत्या घराची खरेदी केली असताना पोलिसांना हाताशी धरून मूळ घर मालकाच्या मुलाकडून जातीवाचक अर्वाच्य शिवीगाळ आणि मारहाण करण्याबरोबरच विविध प्रकारे त्रास देऊन आम्हाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या पाठीशी कोणीच नसल्यामुळे प्रशासनाने मदत करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मच्छे येथील अनिता रविंद्र कांबळे या दलित महिलेने केली आहे.
शहरामध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ती बोलत होती. अनिता कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर 48 वर्षीय महिला आपल्या कुटुंबासमवेत गेल्या 18 वर्षापासून आंबेडकर लेन, फर्स्ट स्टॉप खानापूर रोड, मच्छे तेथील घर नं. 629 येथे वास्तव्यास आहे. आपले पती रवींद्र आणि तीन मुलींसमवेत राहणाऱ्या अनिता यांनी केल्या 18 वर्षात पदरमोड करून घराची चांगली सुधारणा केली आहे.
सदर घराचे मालक सिद्राय लाड असले तरी ते घर त्यांची मुलगी अंजली अतुल केसरकर हिच्या नावावर आहे. त्यामुळे गेल्या 2004 साली कांबळे कुटुंबाने अंजली केसरकर यांच्याकडून 3 लाख 70 हजार रुपयाला सदर घर खरेदी केले आहे. घराचा खरेदी करार करताना ॲडव्हान्स पावती म्हणून 1 लाख 65 हजार रुपये देण्याबरोबरच खरेदीच्या उर्वरित रकमेपोटी कांबळे कुटुंबाने अंजली केसरकर यांची बँकेतील कर्जाची थकबाकी देखील भरली.
ही थकबाकी भरल्यानंतर बँकेकडे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मागितले असता त्यांनी खातेदार अंजली केसरकर यांना बोलावून आणा असे सांगितले. मात्र त्यानंतर अंजली केसरकर कधीच कांबळे कुटुंबीयांसोबत बँकेत जाण्यास तयार झाल्या नाहीत. त्या कायम टाळाटाळ करत राहिल्या.
मध्यंतरी सिद्धराय लाड यांचा मुलगा व अंजलीचा भाऊ अरुण लाड याने अनिता कांबळे यांच्या घरात घुसून त्यांना जातीवाचक अर्वाच्य शिवीगाळ केली. तसेच त्यानंतर आपली बहीण अंजली हिच्यासह कांही लोकांना घेऊन अरुण लाड याने पुन्हा कांबळे कुटुंबीयांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. कांबळे आपल्या घराच्या जागेतच छोटे दुकान चालवतात. त्या दुकानाचीही त्यांनी नासधूस केली. या संदर्भात अनिता व रविंद्र कांबळे यांनी पोलिसात ॲट्रॉसिटीची तक्रार केली.
सामंजस्याने वाद मिटवा असे सांगत पोलिसांनी प्रथम तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली मात्र नंतर तक्रार दाखल करून घेतली. मात्र त्यानंतर तात्काळ कोणतीच कारवाई केली नाही. दरम्यान अटकपूर्व जामीन मिळविलेल्या लाड कुटुंबातील सदस्यांकडून आता पुन्हा अनिता कांबळे व कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या घरासमोरून ये-जा करत त्यांना अप्रत्यक्षरीत्या धमकावले जात आहे.
या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. बळाचा वापर करून आम्हाला जबरदस्तीने घराबाहेर काढल्यास आम्ही रस्त्यावर येणार आहोत. सध्या आम्ही प्रचंड दहशतीखाली असून आमच्या बाजूने कोणीही नाही. तेंव्हा प्रशासनाने आम्हाला मदत करून न्याय मिळवून द्यावा, अशी अनिता कांबळे यांची मागणी आहे