बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पशु संगोपन खात्यामार्फत डेअरी, शेळीपालन आणि कुक्कुटपालनाचे (पोल्ट्री फार्म) मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून त्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव पशु संगोपन खात्यामार्फत डेअरी, पोल्ट्री व शेळी पालन यासंदर्भात मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थींची राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही केली जाणार आहे. जिल्ह्यासह तालुक्यात शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन आणि कुक्कुटपालन (पोल्ट्री फार्म) करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
मात्र प्रशिक्षणाविना हे व्यवसाय चालविणे अनेकांना अडचणीचे जात आहे. त्यामुळे सदर व्यवसाय सुरू करण्यापासून तो कसा चालवावा? येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी? व्यवसायाचा विस्तार कसा वाढवावा? याबाबत पशुवैद्यकीय खात्याचे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तरी या संधीचा लाभ घेऊ इच्छुकांनी महांतेशनगर येथील प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सदर प्रशिक्षणा संदर्भात बोलताना महांतेशनगर येथील पशुवैद्यकीय प्रशिक्षण केंद्राचे डॉ. अशोक दुर्गण्णावर यांनी आमच्या खात्यातर्फे डेअरी, पोल्ट्री, शेळ्या -मेंढ्या आणि कुक्कुटपालना विषयी इच्छुकांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आज सोमवारपासून शेळ्या व मेंढ्या पालनाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी 50 जणांनी अर्ज केले आहेत. डेअरी आणि पोल्ट्री व्यवसाय प्रशिक्षणाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही असे सांगून इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.