महिन्या दोन महिन्यापूर्वी मच्छे येथील एका कॅन्टीनमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आता भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांनी आज मंगळवारी सकाळी खानापूर शहरातील जांबोटी क्रॉस येथील एका हॉटेलमध्ये चहा आणि नाश्त्याचा आस्वाद घेतल्यामुळे हा मोठा कौतुकाचा विषय झाला आहे.
गोव्याहून बेळगावकडे जात असताना आज मंगळवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास बीएमडब्ल्यू आणि इनोव्हा कारमधून आशिष नेहरा आणि त्यांचे सहकारी खानापुरात दाखल झाले होते. प्रारंभी याची कोणाला कल्पना आली नाही, मात्र थोड्याच वेळात वस्तुस्थिती लक्षात येतात अत्यंत साध्या पेहरावात असणाऱ्या नेहरा यांच्यासोबत अनेक तरुणांनी सेल्फी घेतली.
खानापुरातील मलप्रभा क्रीडांगणावर आज सकाळी नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळून चहासाठी आलेल्या खेळाडूंनी आशिष नेहरा यांना पाहताच त्यांना गराडा घातला. यावेळी ‘मित्रांनो नाश्ता करू द्या, सगळ्यांशी बोलतो आणि सेल्फीही देतो’, असे म्हणत नेहरा यांनी उपस्थित स्थानिक खेळाडूंना निराश केले नाही
कांही दिवसापूर्वी वैजू निट्टूरकर या नागुर्डा (ता. खानापूर) येथील युवकाच्या मच्छे, बेळगाव येथील चहाच्या दुकानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी चहाचा आस्वाद घेतला होता. तो प्रसंग त्यांनी सोशल मीडियावरही शेअर केला होता.
त्यानंतर आज आणखी एका स्टार क्रिकेट खेळाडूने खानापूरला भेट दिली. या पद्धतीने दोन महिन्यांच्या कालावधीत भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंना पाहण्याची व भेटण्याची संधी स्थानिक तरुणांनी अनुभवली. नुकताच बेळगावात झालेल्या आमदार अनिल बेनके आयोजित ऑल इंडिया लेवल टेनिस क्रिकेट स्पर्धेत देशातील प्रत्येक राज्यातून दिग्गज खेळाडू बेळगावला आले होते आणि बेळगावचे वातावरण क्रिकेटमध्ये बनलं होतं त्यातच नेहरा यांची भेट देखील क्रिकेटर रसिकांना चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांनी खानापूरला भेट दिल्याने परिसरात हा कौतुकाचा विषय ठरला आहे. हॉटेलचे मालक महंमद नंदगडी हे स्वतः क्रिकेटचे मोठे चाहते असल्यामुळे त्यांनी आजचा दिवस संस्मरणीय असल्याचे सांगितले.