कोनेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील एका कॉग्रेस कार्यकर्त्याने राजमाता जिजाऊ व बेळगांव ग्रामीणच्या आमदारांचा एकत्रित फोटोफ्रेम आमदाराना भेट देण्याच्या कृतीमुळे समस्त शिवभक्तामध्ये संतापाची लाट उसळली असून त्याच्या निषेधार्थ उद्या रविवारी सकाळी 10 वाजता सुळगा येथे रास्तारोको आंदोलन छेडण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील शिवभक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या चित्रफितीत ही माहिती दिली आहे. कोनेवाडी येथील एका काँग्रेस कार्यकर्त्याने बेळगाव ग्रामीणच्या आमदार व राजमाता जिजाऊ यांचे एकत्रित फोटो असलेली फोटोफ्रेम आमदार त्या महिला आमदाराला त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिली होती.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची महती जगजाहीर आहे. मात्र कोणाची बरोबरी कोणाशी करावी याचे भान नसलेल्या त्या काँग्रेस कार्यकर्त्याने आमदारांची राजमाता जिजाऊ यांच्याशी बरोबरी केली आहे आणि हा प्रकार आम्ही हिंदू कदापि खपवून घेणार नाही, असे प्रसिद्धीस दिलेल्या चित्रफितीत परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
संबंधित काँग्रेस कार्यकर्त्याच्या त्या कृतीचा निषेध करून पोलीस प्रशासनाने 15 दिवसाच्या आत तो फोटो परत मिळवावा अशी समस्त शिव भक्तांनी मागणी केली होती. मात्र आता 15 दिवस झाले तरी अजून तो फोटो परत मिळाला नाही.
यासाठी सुळगा येथे रविवार दि. 22 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शिव भक्तांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आले आहे.