बेळगाव लाईव्ह : सीमालढ्याचे नेते व स्वातंत्रसैनिक काॅ. कृष्णा मेणसे यांना द.ना.गव्हाणकर स्मृती पुरस्काराने आज डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आजरा येथे पार पडलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार तर अध्यक्षस्थानी राजेश पाटील तर प्रमुख उपस्थितीत आमदार प्रकाश आबीटकर होते. जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत तर कॉ. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीमुळे सीमाभागात मराठी भाषा व संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. कारवारमधील १०० मराठी शाळा बंद झाल्या. त्याचे महाराष्ट्रात कुठेही पडसाद नाहीत हे दुर्दैव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,अमर शेख व द.ना. गव्हाणकर यांच्या पोवाड्यांनी सीमालढ्याला बळ मिळाले. मात्र द.ना. गव्हाणकर हे उपेक्षित राहिले. त्याचा शोध आजरेकरांनी घेऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे. गव्हाणकरांच्या स्मृती जतन करण्यासाठी सुरु असलेला उपक्रम स्तुत्य आहे.
बेळगाव भागात शंभर टक्के मराठी माणसं असतानाही त्यांच्यावर अन्याय होतो. शिकणारी, वाचणारी व विचार करणारी मराठी मुलं सध्या कर्नाटकच्या दडपशाहीमुळे कानडी झाली आहेत. याबाबत पीएचडी करणाऱ्या अभ्यासकांनी याचे संशोधन करून तो प्रबंध सादर करण्याची गरज असल्याचेही डॉ. जयसिंगराव पवार यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना कॉ. कृष्णा मेणसे यांनी, देशाला मिळालेले स्वराज्य सुराज्य झाले पाहिजे. कामगार, शेतकरी यांची कुचंबणा होऊ नये यासाठीच संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सातवेळा तुरुंगात जावे लागले, असे सांगितले.
यावेळी आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी आमदार श्रीपतराव शिंदे, जयवंत शिंपी, अंजना रेडेकर, संभाजी पाटील, एम.के. देसाई, जनार्दन टोपले, सुनील शिंत्रे, आनंद मेणसे, सुधीर देसाई, अल्बर्ट डिसोझा, रचना होलम, अस्मिता जाधव, संजय पाटील, युवराज पोवार यासह आजरा तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार अशोक शिवणे यांनी मानले.