Saturday, January 4, 2025

/

कॉ कृष्णा मेणसे यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार

 belgaum

बेळगांव येथील कामगार, कष्टकऱ्यांचे नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी कॉ कृष्णा मेणसे यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

गेली 80 वर्षांहून अधिक काळ श्रमिक, कष्टकरी, कामगार शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे आणि बिदर-भालकी, बेळगांव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी आपले आयुष्य वेचणारे कॉ. कृष्णा मेणसे यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना.गव्हाणकर स्मृती पुरस्कार देण्याचा निर्णय आज येथे झालेल्या पुरस्कार व स्मारक समितीच्या बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष रवींद्र आपटे होते.

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत खांद्याला खांदा लावून लढलेले कॉ कृष्णा मेणसे यांनी तब्बल अकरा महिण्याहून अधिक काळ महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यासाठी तुरुंगवास भोगाला आहे. एका बाजूला भाषावार प्रांतरचनेत कर्नाटकात राहिलेल्या मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना लाल बावटा खांद्यावर घेऊन बेळगांव परिसरातील श्रमिक कष्टकऱ्यांचे अनेक लढे त्यांनी लढविले.

गोकाक येथील गिरणी कामगारांचा प्रश्न असो कि हिंडालको कंपनीच्या कामगारांना न्याय देणे असो कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. कामगारांच्या बरोबरच खानापूर तालुक्यातील त्यांनी काढलेला शेतकऱ्यांचा बंदूक मोर्चा विशेष गाजला होता.
चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना त्यांनी पत्रकारिताही केली. हेमंत नावाचे मासिक आणि नंतर साम्यवादी नावाने साप्ताहिक सुरु करून आपल्या लेखणीतून कष्टकरी श्रमिकांचे प्रश्न मांडले. त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा मोठा प्रभाव होता. राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्यासोबत बेळगांव परिसरात सत्यशोधक विचारांच्या प्रसाराचे त्यांनी काम केले. कार्यकर्ता पत्रकार म्हणून काम करीत असताना त्यांनी उत्तम वैचारिक साहित्यही जन्माला घालून प्रबोधनाच्या चळवलीला गती देण्याचे काम केले आहे. हो ची मिन्ह यांचे चरित्र, बसवेश्वर ते ज्ञानेश्वर, अशा तोडल्या बेड्या, असा लढलो असा घडलो, गोठलेली धरती पेटलेली मने, गोवा मुक्ती आंदोलन, डॉ आंबेडकर आणि बुद्धधर्म याबरोबर विरगाथा या कन्नड पुस्तकाचे अनुवादन, परिक्रमा प्रवासवर्णन, वीररांनी कित्तूर चन्नामा इतके विपुल लेखन आपल्या धकाधकीच्या आयुष्यात केले आहे. लोकशाहीर द. ना. गव्हाणकर आणि त्यांचे व्यक्तिगत आयुष्यात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. पुरस्कार वितरण 22 जानेवारी 2023 रोजी आजरा येथे होणार आहे.

Krishna mense
Comred Krishna mense

बैठकीच्या सुरवातीला समितीचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी मागील तीन वर्षाचा आढावा घेतला. त्यानंतर कांही नावे पुरस्कारासाठी पुढे आली त्यातून कॉ. कृष्णा मेणसे यांचे नाव यावर्षीच्या पुरस्कारासाठी सर्वानुमते निश्चित करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, जेष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे, प्रा नवनाथ शिंदे, सचिव सुनील पाटील, नामदेव नार्वेकर, संजय घाटगे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.