बेळगाव लाईव्ह : सारथी नगर येथे लोकवस्तीत अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या प्रार्थना स्थळाला महानगरपालिकेने टाळे ठोकण्याचा आदेश दिला होता. महानगरपालिकेने वक्फ बोर्डाला दिलेल्या आदेशानुसार अखेर सदर प्रार्थनास्थळाला टाळे ठोकण्यात आले आहेत.
खाजगी व्यक्तीकडून जागा खरेदी करून लोकवस्तीत अनधिकृतरित्या प्रार्थना स्थळ बांधण्याची तयारी सुरू होती. ही बाब हिंदू संघटनांच्या निदर्शनात आल्यानंतर विविध हिंदू संघटना आणि भाजप नेत्यांनी प्रखर विरोध व्यक्त केला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले होते.
याप्रकरणी सदर प्रार्थना स्थळाला टाळे ठोकण्याचा आदेश महानगरपालिकेने दिला असून या आदेशाची अंमलबजावणी आज करण्यात आली आहे. यादरम्यान प्रार्थना स्थळाच्या परिसरात सुरक्षेसाठी के.एस.आर.पी. तुकडी तैनात करण्यात आली असून येत्या आठ दिवसात अनधिकृत बांधकाम हटवण्यात यावे अन्यथा या विरोधात व्यापक आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा हिंदू संघटना आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सदर बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप करत पोलीस विभागालाही निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी प्रार्थनास्थळाचे अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन सादर केले होते.