बेळगाव लाईव्ह : जमीन खरेदी व्यवहारात लाच घेतल्याप्रकरणी चिकोडी येथील वरिष्ठ उपनिबंधक आणि त्यांच्या कार्यालयीन सहाय्यकांवर कर्नाटक लोकायुक्तांनी कारवाई केली आहे.
फिर्यादी राजू लक्ष्मण पाच्छापूर (रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. चिकोडीचे वरिष्ठ उपनिबंधक जी. पी. शिवराजू तसेच त्यांचे सहाय्यक आणि कॉम्प्युटर ऑपरेटर हुसेन इमामसाब रेहमानभाई आणि संदीप शंकर पाटील या तिघांवर लोकायुक्तांनी कारवाई केली आहे.
फिर्याददाराने चिकोडी तालुक्यातील डोनेवाड या गावात जमीन खरेदी केली असून जमीन खरेदीच्या दस्ताऐवजाची नोंद करण्यासाठी चिकोडी उपनिबंधक कार्यालयात गेले असता, चिकोडीचे वरिष्ठ उपनिबंधक जी. पी. शिवराजू यांनी 30000 रुपयांची मागणी केली. यानंतर फिर्यादी राजू पाच्छापूर यांनी कर्नाटक लोकायुक्त यांच्या बेळगाव मधील कार्यालयात लाच मागितल्या प्रकरणी तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला. फिर्यादी कडून 30 हजार रुपयांची लाच घेताना जी. पी. शिवराजू, हुसेन इमामसाब रहमानभाई, आणि संदीप शंकर पाटील यांना रंगेहात पकडण्यात लोकायुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
लोकायुक्त न्यायमूर्ती बी. एस. पाटील, बेंगलोर येथील आयपीएस एडीजीपी प्रशांत कुमार ठाकूर, तसेच आयपीएस आयजीपी सुब्रमणेश्वर राव यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव लोकायुक्त पोलीस अधीक्षक यशोदा वंटगुडी यांनी ही कारवाई केली आहे.