बेळगाव : एकसंबा-रायबाग मार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या आणि बेशुद्धावस्थेत असलेल्या दुचाकीस्वाराच्या मदतीला चिकोडी उपविभागीय अधिकारी धावून आले आहेत.
महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथील ऊस तोडणी कामगार असलेल्या दत्ता नामक इसमाचा दुचाकीवरून जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडक बसून अपघात झाला.प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्ध झाला. मात्र यावेळी जखमी दुचाकीस्वाराच्या मदतीला कुणीच आले नाही.
याच मार्गावरून जाणारे चिकोडीचे उपविभागीय अधिकारी माधव गीते यांच्या निदर्शनास हि बाब आली. आणि त्यांनी आपले वाहन थांबवून जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल केले. जखमी दुचाकीस्वारावर वेळीच उपचार झाल्याने त्याला जीवदान मिळाले आहे.
याबाबत बोलताना माधव गीते म्हणाले, अनेकवेळा अशा घटना घडत असतात. मात्र नागरिक जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यास पुढाकार घेत नाहीत. असे न करता नागरिकांनी अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यास एखाद्याचा जीव वाचू शकतो.
आज अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मेंदूच्या सिटी स्कॅनसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.