बेळगाव लाईव्ह : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या विचारातून भावी पिढीला धर्म रक्षणाची प्रेरणा मिळावी, शिवकालीन इतिहास आठवावा या उद्देशाने शहर उत्तर मतदार संघाचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या पुढाकाराने शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराज मूर्ती परिसरात लक्षवेधी स्मारक उभारण्यात आले असून पूर्वीच्या मूर्ती परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या स्मारकासाठी शहर विकास प्राधिकरणाने ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी सुमारे २७ लाख रुपये आतापर्यंत स्मारक परिसर सुशोभीकरणासाठी खर्च करण्यात आले आहेत.
शहराचा केंद्रबिंदू असलेल्या ध. संभाजी चौकात सुशोभीकरण करून नव्याने उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. 28 जानेवारी रोजी होणार आहे. ध. संभाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आमदार बेनके यांच्या प्रयत्नामुळे बुडाकडून 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या निधीतील 12 लाख रुपये महापालिकेकडून आणि 15 लाख रुपये बुडाकडून मिळाले आहेत.
उर्वरित निधीसाठी अभियंता मुरली बाळेकुंद्री पाठपुरावा करत असून लवकरच तो निधीही मिळणार आहे. प्रारंभी सदर स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर कोरोनाचे संकट कोसळले. त्यामुळे हे काम जवळपास दीड -दोन वर्षे ठप्प झाले होते. मात्र त्यानंतर गेल्या दीड वर्षात आमदार बेनके यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली स्मारकाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
माजी आमदार दिवंगत संभाजी पाटील यांनी सर्वप्रथम 2000 साली ध. संभाजी चौकात छ. संभाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मात्र त्यावेळी मूर्ती परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले नव्हते. स्मारक परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे,अशी तमाम शिवभक्तांकडून मागणी करण्यात येत होती. या मागणीला अनुसरून 2012 साली श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळाने तत्कालीन आयुक्तांकडे ध. संभाजी चौकातील मूर्ती परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव मांडला होता. मात्र या प्रस्तावाला प्रतिसाद न मिळाल्याने आम. अनिल बेनके यांच्याकडे स्मारक सुशोभीकरणासाठी प्रस्ताव मांडण्यात आला.
विविध हिंदुत्ववादी संघटना, विविध मंडळे आणि मराठा समाजातील विविध मान्यवरांनीही हा प्रस्ताव उचलून धरला. यानुसार स्मारक सुशोभीकरणासाठी आमदार अनिल बेनके यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या आराखड्यानुसार अंदाजे ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होते. सदर आराखडा योग्य असल्याची पडताळणी करून आम. अनिल बेनके यांनी सुशोभीकरण प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला.
स्मारक परिसरात दोन भव्य बुरुज आणि मध्यभागी धर्मवीर छ. संभाजी महाराजांची मूर्ती या पद्धतीने दुर्ग किल्ल्यामध्ये महाराज उभे आहेत अशा पद्धतीचा आराखडा तयार करण्यात आला होता. याचप्रमाणे आदिशक्ती तुळजाभवानी मूर्तीची अष्टरूप स्वरूपातील मूर्ती प्रतिष्ठापना देखील आराखड्यानुसार करण्यात आली आहे. भावी पिढीला महाराजांच्या विचारातून, तत्वातून प्रेरणा मिळावी, हा या स्मारक परिसर सुशोभीकरणामागील उद्देश आहे.