केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्देशानुसार मंत्रालयाचे आयएफएस अधिकारी डॉ. अंजनकुमार यांनी काल मंगळवारी कणकुंबी जवळील (ता. खानापूर) म्हादाई नदीपात्राच्या कळसा नाला व मलप्रभा भुयारी कालवे तसेच लगतच्या परिसराची पाहणी केली.
राज्य सरकारने विकास काम हाती घेतलेल्या कळसा कालव्याच्या ठिकाणी पाहणी करून डॉ. अंजनकुमार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यासाठी माऊली मंदिराच्या मागे कर्नाटक सरकारने हाती घेतलेल्या कळसा डायव्हर्शन कालव्याचे निरीक्षण केल्यानंतर कणकुंबी विभागाच्या कार्यालयात म्हादाई आणि कळसा प्रकल्पाबाबत वना विभागाचे अधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांकडून डॉ. अंजनकुमार यांनी माहिती घेतली.
कळसा -भांडुरा प्रकल्पात वनविभागातील अधिकाधिक जमीन जात असल्याने हा दौरा प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे आयएफएस अधिकारी डॉ. अंजनकुमार यांनी कालच्या दौऱ्यात प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेत लवकरच अहवाल मंत्रालयाला पाठविणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी बेळगाव जिल्हा वनसंरक्षणाधिकारी हर्षा बानू, एसीएफ संतोष चव्हाण, आरएफओ कविता इरणट्टी आदी वन खात्याच्या अधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.
दरम्यान, म्हादाई (कळसा -भांडुरा) प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी वन आणि वन्यप्राण्यांशी संबंधित उपाययोजनांबाबत केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारकडे आहेत. त्यामुळे म्हादाई प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण खात्याची मंजुरी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला आहे.