बेळगाव लाईव्ह : बेळगावसह संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील नाट्य कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गेली १० वर्षे भरविण्यात येत असलेल्या कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेच्या शालेय गटातील एकांकिका स्पर्धेला आज उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. शालेय स्तरावरील जवळपास चार संघांनी आज एकांकिका सादर केल्या.
महिला विद्यालय मराठी माध्यमाच्या विद्यार्थिनींनी आज ‘सत्यम शिवम सुंदरम’ एकांकिका सादर केली. हिंदू संस्कृतीतील विविध सण-उत्सव जपणाऱ्या आणि सण-उत्सवाचे महत्व सांगणाऱ्या एकांकिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळविली. यावेळी या विद्यार्थिनींनी कॅपिटल वन संस्थेचे आभार मानत आपल्याला या संस्थेमुळे आपली कला सादर करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले.
बेळगावमधील शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्य सादरीकरणावर महाराष्ट्र आणि गोव्यातील परीक्षकांनीही कौतुक व्यक्त केले. कॅपिटल वन संस्थेतर्फे आयोजिण्यात येणाऱ्या एकांकिका स्पर्धेमुळे विविध भागातील कलाकारांना कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते, याबद्दल परीक्षक म्हणून आलेले मुंबई येथील राजीव जोशी यांनी प्रशंसा केली. शिवाय अशा स्पर्धेला अधिकाधिक प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
सोलापूर येथील सुनील गुरव आणि गोव्यातील देविदास सामंत यांनीही बेळगावच्या कलाकारांचे आणि कॅपिटल वन संस्थेचे कौतुक केले. बेळगावमधील कलाकारांना ज्यापद्धतीने व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे त्याचप्रमाणे नाट्यक्षेत्रातील मार्गदर्शन मिळविण्यासाठीदेखील पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या एकांकिका स्पर्धेसंदर्भात माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष शिवाजी हंडे म्हणाले, गेली १० वर्षे सातत्याने या स्पर्धा भरविण्यात येत असून बेळगावमधील तरुण कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंदा आंतरशालेय गटाचीही स्पर्धा भरविण्यात येत असून या माध्यमातून राजकीय, सामाजिक घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकणाऱ्या अनेक एकांकिकांचे सादरीकरण होते. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच या सर्व एकांकिकांचा आस्वाद घेण्यासाठी बेळगावकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.