‘बेळगाव शहर स्वच्छतेच्या कामाचे 19 कोटी 11 लाख 29 हजार रुपयांचे कंत्राट बीव्हीजी कंपनीला मिळाले असून या पद्धतीने पहिल्यांदाच शहर स्वच्छतेचे काम नामांकित कंपनीकडून सुरू होणार आहे. शहर स्वच्छतेच्या 5 पॅकेजीस पैकी 4 पॅकेज मधील प्रभागांच्या स्वच्छतेच्या कामाचे कंत्राट बीव्हीजी कंपनीला मिळाले आहे.
बेळगाव शहर स्वच्छतेच्या कंत्राटासाठी 57 लाख 34 हजार रुपये इतकी सुरक्षा अनामत रक्कम भरण्याची लेखी सूचना महापालिकेने बीव्हीजी कंपनीला केली आहे. ही अनामत रक्कम भरण्यास कंपनीला 20 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
शहर स्वच्छतेचे हे कंत्राट एक वर्षाच्या कालावधीसाठी असणार असून अनामत रक्कम भरल्यानंतर कंपनीला कार्यादेश दिला जाणार आहे. त्यानंतर पहिल्यांदाच शहर स्वच्छतेचे काम नामांकित कंपनीकडून सुरू होणार आहे. शहर स्वच्छतेच्या कामासाठी मनुष्यबळ व वाहने पुरवण्याची जबाबदारी बीव्हीजी कंपनीवर असणार आहे.
शहर स्वच्छता कंत्राटाचे विवरण पुढील प्रमाणे आहे. पॅकेज क्र. 1 मधील प्रभाग : 58, 57, 56, 50, 51, 52, 53, 54, 49, 40, 41, 42, 43, 44, 30. कंत्राटाची रक्कम -5 कोटी 47 लाख 43 हजार 171 रुपये. पॅकेज क्र. 2 मधील प्रभाग : 9, 10, 15, 16, 21, 22, 23, 24, 27, 28, 29, 39. कंत्राटाची रक्कम -5 कोटी 44 लाख 94 हजार 389 रुपये. पॅकेज क्र. 4 मधील प्रभाग :12, 13, 14, 18, 19, 20, 35, 36, 37, 38, 45, 47, 48, 55. कंत्राटाची रक्कम -5 कोटी 44 लाख 94 हजार 389 रुपये.
पॅकेज क्र. 5 मधील प्रभाग : टीएचबी कॉलनी, बसवन कुडची व कुमार स्वामी लेआउट. कंत्राटाची रक्कम -2 कोटी 73 लाख 97 हजार 901 रुपये. स्वच्छतेच्या कामाच्या कंत्राटासाठी महापालिकेने काढलेल्या 5 पॅकेजच्या निविदांपैकी पॅकेज क्रमांक 3 वगळता चार पॅकेजेससाठी बीव्हीजीने निविदा दाखल केली होती.
त्यांचे कंत्राट कंपनीला देण्यात आले असून पॅकेज क्र. 3 साठी काढलेल्या फेरनिवेदीत बीव्हीजीनेच निविदा दाखल केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या पॅकेजची जबाबदारी देखील पीव्हीजी कंपनीकडे दिली जाणार आहे.