समाजाला राष्ट्रनिष्ठेची शिकवण आणि चारित्र्य संवर्धनाचा संस्कार देण्याचे कार्य शिवचरित्राकडून होत आहे. शिवचरित्र घराघरात आणि मनामनात पोहोचणे आवश्यक असल्यानेच शिवाजी महाराजांवरील महानाट्याचे आयोजन खानापूर मध्ये केले आहे अशी माहिती तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुप आणि खानापूर भाजप नेते विठ्ठलराव हलागेकर यांनी दिली.
खानापूर तालुक्यातील शिवप्रेमींना शिवरायांच्या उत्तुंग कर्तृत्वाची अनुभूती पाहता यावी यासाठी आज शनिवार दि. 7 जानेवारीपासून सलग चार दिवस शांतिनिकेतन शाळेच्या मैदानावर शिवगर्जना या महानाट्याचे सादरीकरण केले जाणार आहे. या महानाट्यासाठी भव्य सेट उभारण्यात आला असून 15 हजार प्रेक्षक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुप आणि खानापूर भाजप वतीने भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी सांगितले की हलगेकर यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि विचार सर्वकालिक आहेत.यासाठी दि. 7 ते 10 जानेवारी या काळात दररोज सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य म्हणून लौकिक मिळवलेल्या शिवगर्जना महानाट्याचा रोमांच अनुभवता येणार आहे. यामध्ये 350 कलाकारांसह बैलगाडी, घोडे, हत्ती यांचा समावेश असणार आहे. 120 फूट लांब आणि 60 फूट रुंदीचा भव्य रंगमंच तयार करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.
एका वेळेला 15 हजार प्रेक्षक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था, डोळ्याचे पारणे फेडणारा राज्याभिषेकाचा सोहळा आणि आकाशात होणारी डोळे दिपून टाकणारी आतषबाजी हे महानाट्याचे विशेष आहे. शिवप्रेमींना निशुल्क प्रवेश दिला जाणार आहे. या महानाट्याचा नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी साठ हजार मोफत पास वितरित करण्यात येणार आहेत. प्रति दिन 15000 शिवप्रेमींना महानाट्य याची देही याची डोळा पाहता येणार आहे असेही त्यांनी सांगितले
महानाट्याच्या उत्कृष्ट आयोजनासाठी जय्यत पुर्वतयारी सुरू आहे. शंभरहून अधिक स्थानिक कलाकारांनाही महानाट्यात अभिनय करण्याची संधी दिली जाणार आहे. स्थानिक विद्यार्थी, तरुण-तरुणी महानाट्यात चमकणार असल्याने सर्वत्र मोठी उत्कंठा पसरली आहे.