बेळगाव लाईव्ह : डब्बे, कुक्कर वाटप करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे नागरिकांच्या मूलभूत सुविधेकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत गुरुवारी ‘बेळगाव लाईव्ह’ने वृत्त प्रकाशित केले. बेळगुंदी आणि परिसरात योग्य बससुविधा उपलब्ध नसल्याने संतप्त नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाविरोधात निषेध पत्रक काढले. हे निषेध पत्रक देखील सोशल मीडियावर वायरल झाले. हा मुद्दा ‘बेळगाव लाईव्ह’ ने उचलून धरला आणि दिवसभरात हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले.
या वृत्ताची दखल घेत हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी तातडीने परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेत सदर समस्येची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांसमोर उद्भवलेल्या या समस्येवर तातडीने तोडगा काढून बस व्यवस्था पुरविण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदनही सादर केले. सदर निवेदन स्वीकारून केएसआरटीसी डेपो प्रभारी होसमनी यांनी दखल घेत येत्या सोमवारपासून समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. सोमवारी पासून या गावच्या विद्यार्थ्याची समस्या सुटणार आहे.
बेळगुंदी, सोनोली, राकसकोप यासह आसपास विद्यार्थ्यांना सकाळी ७ ते १० या वेळेत बससुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. निवडणुकीच्या मुद्द्यावरून एका पायावर कोणत्याही गोष्टीसाठी तयार असणाऱ्या राजकारण्यांना अशा महत्वाच्या मुद्द्यावर काम करून अशा समस्या सोडविणे महत्वाचे वाटत नाही. यामुळे राजकारणी आणि लोकप्रतिनिधींना कानपिचक्या देणारे वृत्त आज ‘बेळगाव लाईव्ह’ वरून प्रसारित झाले. या वृत्ताची दखल घेत नागेश मन्नोळकर यांनी तातडीने समस्या सोडविण्यासाठी के एस आर टी सी डेपो प्रभारींची भेट घेऊन विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले असून त्यांना परिवाहन खात्या कडून ठोस आश्वासन मिळाले आहे
कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रलोभने देण्यात येत आहेत. मात्र शालेय विद्यार्थ्यांच्या बससुविधेकडे मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने ग्रामीण मतदार संघाच्या आमदारांविरोधात सोशल मीडियावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.
या मुद्द्याला अनुसरून आज ‘बेळगाव लाईव्ह’ वर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेतली गेल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागातील अनेक नागरिकांनी ‘बेळगाव लाईव्ह’शी थेट संपर्क साधून आभार व्यक्त केले आहेत.