बेळगाव लाईव्ह : सालाबाद प्रमाणे यंदाही सौंदत्ती श्री रेणुका यात्रेवरून परतलेल्या भाविकांची नवगोबा यात्रा आज बेळगाव मध्ये भक्तीपूर्ण वातावरणात पार पडली. दरवर्षी मध्यवर्ती बस स्थानकाच्या जागेवर पार पडणारी ही यात्रा यंदा देवस्थान समितीच्या हक्काच्या जागेवर पार पडली.
या जागेसंदर्भात शहर देवस्थान समिती आणि परिवहन खात्यामध्ये अलिखत करार झाला असून छ. शिवाजी नगर येथील पेट्रोल पंपसमोर असलेल्या खुल्या जागेत २ गुंठे जागा देवस्थान समितीला देण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहर देवस्थान समिती आणि बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांच्या माध्यमातून सातत्याने परिवहन खात्याकडे आणि सरकारकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे शहर देवस्थान समितीला हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. पूर्वीपासून मध्यवर्ती बस स्थानकाच्या जागेवर पार पडणारी ही यात्रा यंदा बस स्थानकाचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी होऊ शकली नाही.
यामुळे परिवहन खात्याने पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. सदर जागा खुलीच ठेवण्याचे आवाहन शहर देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच यापुढे होणाऱ्या सर्व यात्रा याच जागेवर आयोजित केल्या जाणार आहेत अशी माहिती शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांनी दिली.
देवस्थान समितीसाठी देण्यात आलेली दोन गुंठे जागा लवकरच देवस्थान समितीच्या नावे हस्तांतर करण्यात येणार आहे. याबाबत परिवहन खात्याने पत्रही देवस्थान समितीकडे सुपूर्द केले असून या संदर्भात देखील सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही आमदार अनिल बेनके यांनी दिली.
शहर देवस्थान समितीला उपलब्ध करून देण्यात आलेल्या नव्या जागेत आज सौंदत्ती येथून परतलेल्या रेणुका देवी भाविकांनी मोठ्या उत्साहात पडली पूजनाचा कार्यक्रम पार पाडला. विधिवत पडली भरण्याच्या कार्यक्रमादरम्यान शेकडो भाविकांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके, शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर,नगरसेवक शिवाजी मंडोळकर,सुनील जाधव आदी मान्यवर देखील उपस्थित होते.