बेळगाव लाईव्ह : ‘अमृत सरोवर’ या शासनाच्या तलावांचा विकास आणि संवर्धन करणाऱ्या योजनेअंतर्गत तालुक्यातील विविध गावात तलावांचा विकास करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत बेळगाव तालुक्यातील दहा तलावांचा विकास केला जाणार असून प्रत्येक तलावाला ३४ ते ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
‘अमृत सरोवर’ ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत असून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील तलावांचा विकास करण्यासाठी अमृत सरोवर योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ७५ गावांमधील प्रत्येकी एक तलाव विकसित केला जात आहे. अमृत सरोवर योजनेंतर्गत बेळगाव तालुक्यातील दहा गावांसाठी ४ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
जिल्हा पंचायतीच्या पंचायतराज अभियंता विभागाकडून निविदा मागविण्यात आली असून बेळगाव तालुक्यातील मुचंडी, मण्णिकेरी, हिंडलगा, बस्तवाड, अष्टे, अगसगा, केदनूर, निलजी, बेळगुंदी, सुळगा (ये.) या गावांची अमृत सरोवर योजनेसाठी निवड झाली आहे.
यासाठी ई-प्रोक्युरमेंटअंतर्गत सोमवार दि. २३ जानेवारी रोजी निविदा करण्याची अंतिम तारीख असेल तर २७ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता निविदा उघडली जाणार आहे. वर्क ऑर्डर मिळालेल्या, पावसाळा वगळता ४५ दिवसांच्या आत कंत्राटदाराला या योजनेंतर्गत काम पूर्ण करावे लागणार आहे.
या योजनेअंतर्गत मुचंडी या गावासाठी 50 लाख, मन्नीकेरी गावासाठी 45 लाख, हिंडलगा गावासाठी 42 लाख, बस्तवाड गावासाठी 50 लाख, अष्टे गावासाठी 50 लाख, अगसगा गावासाठी 46 लाख, केदनुर गावासाठी 46 लाख ,निलजी गावासाठी 50 लाख, बेळगुंदी गावासाठी ४५ लाख, सुळगा येळ्ळूर गावासाठी 34 लाख इतके अनुदान मंजूर झाले आहे.