‘अत्तं मिय्या काय करू गे बाई’? ग्रामीण भागातील महिलांची उडतेय घाबरगुंडी!
ग्रामीण आमदारांना पराभवाची धास्ती! मंतरलेल्या नारळाची मोठी चलती!
‘मिक्सर’वाटपदरम्यान अघोरी कृत्य करत अंधश्रद्धेला प्रोत्साहन!
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी लोकप्रतिनिधींनी आपले नशीब आजमावण्यासाठी ‘आयडियाच्या कल्पना’ राबविण्यास सुरुवात केली असून, मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात पुन्हा भेटवस्तू वाटपाला पेव फुटले आहे.
कधी कुकर, कधी मिक्सर, कधी डबे आणि कधी ताट-वाट्या वाटप करत ग्रामीण भागातील मतदारांकडून मतदानासाठी शपथ घेतली जात आहे. नंदिहळ्ळी गावात आज हा सारा प्रकार पुढे आला असून या गावातील जागृत वाकडेवड येथील गावचे दोन पुढारी मंतरलेला नारळ घेऊन घरोघरी मतयाचना करत, भेटवस्तूचे आमिष दाखवून महिलांना लक्ष्य करत आहेत.
विद्यमान ग्रामीण आमदारांच्या नावाखाली प्रत्येक घरोघरी जाऊन मिक्सर-ताट-वाट्या-चमचे अशा पद्धतीच्या भेटवस्तूंचे वितरण करण्यात येत आहे. मात्र या भेटवस्तू मतदारांकडे सुपूर्द करण्यापूर्वी त्यांच्याकडून मंतरलेल्या नारळावर हात ठेवून शपथ घेतली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्हालाच मत देऊ.. अशा पद्धतीची शपथ घेतल्यानंतरच भेटवस्तूंचे वितरण केले जात आहे.
प्रत्येक घरोघरी जाऊन हा प्रकार करण्यात आला असून यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाकडेवड हे नंदिहळ्ळी भागातील जागृत देवस्थान असल्याने येथील सर्व नागरिकांची या देवस्थानावर अपार श्रद्धा आहे. परंतु आता आपण नारळावर हात ठेवून शपथ घेतल्याने विपरीत काही घडेल, या समजुतीने महिलावर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहे.
विद्यमान ग्रामीण आमदारांच्या या कृत्याबद्दल काल असाच प्रकार उजेडात आला होता. यासंदर्भातील व्हिडिओदेखील रविवारी दिवसभर चर्चेत राहिला. विद्यमान ग्रामीण आमदारांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीतून ग्रामीण मतदार संघाचा विकास केल्याचे दर्शविण्यात येत आहे.
हा विकास पाहता त्यांना भेटवस्तू वितरित करण्याची कोणतीच आवश्यकता नाही. मात्र आता मतदार जागरूक झाला असून या आमिषाला बळी पडून मत देणार नाही, याची खात्री त्यांना पटल्याने अंधश्रद्धेला दुजोरा आणि प्रोत्साहन देत त्यांनी अघोरी कृत्य करत ग्रामीण भागातील महिला मतदारांना लक्ष्य केले आहे. यामुळे विद्यमान ग्रामीण आमदारांना आपला पराभव समोर दिसत आहे कि पराभवाची धास्ती अधिक लागली आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत.