प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्याच्या उद्देशाने बेळगाव रेल्वे स्थानक या 1881 साली बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकाचा तब्बल 190 कोटी रुपये खर्च करून विकास साधण्यात आला आहे.
नूतनीकरणाद्वारे बेळगाव रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात आला असून जुन्या इमारतीच्या ठिकाणी आता विश्रांती कक्ष, प्रतीक्षा कक्ष, खाद्यपदार्थ विभाग, तिकीट आरक्षण काउंटर्स आदींची सोय असणारी आधुनिक वातानुकूलित दिमाखदार इमारत उभारण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसाठी सर्व फलाट लिफ्ट आणि एलिव्हेटर्सनी जोडण्यात आले आहेत. याखेरीज प्रवाशांची गजबज, गर्दी होऊ नये म्हणून स्थानकात प्रशस्त रुंद हॉलवे तयार करण्यात आला आहे. तसेच दुचाकी आणि चार चाकी गाड्यांच्या पार्किंगची जागा सीमांकित करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या गर्दीचा ताण मुख्य प्रवेशद्वारावर पडू नये यासाठी दक्षिणेकडेला शास्त्रीनगरच्या बाजूला रेल्वे स्थानकात ये -जा करण्यासाठी दुसरे प्रवेशद्वार खुले करण्यात आले आहे.
रेल्वे स्थानक परिसरात नवा कोचिंग डेपो स्थापन करण्यात आला असून ज्यामुळे बेळगाव येथून नव्या रेल्वे सेवा सुरू होण्यास मदत मिळणार आहे. एकंदर नूतनीकरणाद्वारे आवश्यक सर्व सोयी सुविधांनी सज्ज झालेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाला सध्या अधिकृत उद्घाटनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.