भारतीय हवाई दलाची दोन लढाऊ विमाने आज शनिवारी सकाळी ग्वाल्हेर नजीक दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. नेहमीच्या सरावासाठी अवकाशात भरारी घेऊन दुर्घटनाग्रस्त झालेल्या या विमानांमधील दोन वैमानिक गंभीर जखमी झाले असून बेळगावच्या एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे.
विमान दुर्घटनेत वीरमरण पत्करलेले वैमानिक विंग कमांडर हनुमंतराव रेवणसिद्द्प्पा सारथी हे गणेशपुर बेळगाव येथील रहिवासी होते, असे पत्रकार अमित उपाध्ये यांनी ट्विट केले आहे.
सदर लढाऊ विमाने दुर्घटनाग्रस्त होण्याचे कारण शोधण्यासाठी चौकशी व तपास हाती घेण्यात आला आहे. देशात भारतीय वायुसेनेची तीन विमाने आज शनिवारी एकाच दिवशी दुर्घटनाग्रस्त झाली आहेत.
राजस्थान आणि मध्य प्रदेश येथे हे विमान अपघात झाले आहेत. भारतीय वायुसेनेची दोन विमाने मध्यप्रदेशच्या मुरैना येथे आणि एक विमान राजस्थानच्या ग्वाल्हेर नजीक भरतपूरमध्ये कोसळले आहे. राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं लढाऊ विमान सरावा दरम्यान कोसळले. या दुर्घटनेत विमानाचा वैमानिक विंग कमांडर सारथी ठार झाले.
पिंगोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात विमानाचे तुकडे झाले असून अपघातानंतर विमानाला आग लागली. या अपघातात विमानांचा चक्काचूर झाला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या विमान दुर्घटनांमध्ये दोन वैमानिक गंभीर जखमी झाले आहेत.
बेळगावातील गणेशपूर येथील वीरमरण पत्करलेल्या हणमंतराव रेवणसिद्द्प्पा सारथी यांच्या कुटुंबाला लष्करी सेवेची पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील रेवणसिद्द्पा सारती हे आर्मीमध्ये सेवा बजावून कॅप्टन पदावरून निवृत्त झाले आहेत. तर त्यांचा एक भाऊ रवी हेसुद्धा हवाई दलात वैमानिक म्हणून सेवा बजावत आहेत. हणमंतराव यांचे पोस्टिंग सध्या मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे होते. दैनंदिन सरावासाठी त्यांनी ग्वाल्हेर येथून उड्डाण केले होते.
The pilot who died in #GwaliorAirbase crash hails from #Belagavi in #Karnataka
Pilot #HanumanthSarathy was flying #Mirage2000 when the mishap reported @santwana99 @Cloudnirad @ramupatil_TNIE @naushadbijapur@NewIndianXpress @XpressBengaluru @KannadaPrabha pic.twitter.com/vTm6lN3xrc— Amit Upadhye (@Amitsen_TNIE) January 28, 2023
त्यानंतर काही वेळातच त्यांच्या विमानाची आणि अन्य एका विमानाची हवेत धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, २ मुले, भाऊ आणि २ बहिणी असा परिवार आहे. विंग कमांडर हनुमंतराव यांचे पार्थिव उद्यापर्यंत हवाई दलाच्या खास विमानाने बेळगावात आणण्यात येणार असून, त्यानंतर सरकारी-लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.