आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले असून बेळगाव महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी व बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे हे निवडणूक अधिकारी सध्या म्हैसूरमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नियुक्त निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून म्हैसूर येथे तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. म्हैसूर येथील प्रशासकीय प्रशिक्षण केंद्रात 16 ते 18 जानेवारी असे तीन दिवस निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये बेळगाव महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी व बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांचा सहभाग आहे. आज प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस असून प्रशिक्षण पूर्ण करून दोन्ही अधिकारी उद्या गुरुवारी बेळगावला परत येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक दीड किंवा दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी जोरदार पूर्वतयारी सुरू केली आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने देखील निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. आयोगाने राज्यातील मतदान केंद्रांचे सर्वेक्षण देखील हाती घेतले असून गेल्या आठवड्यात बेळगाव दक्षिण व उत्तर या दोन्ही मतदारसंघातील मतदान केंद्रांचे सर्वेक्षण महापालिकेकडून करण्यात आले आहे.