Thursday, January 23, 2025

/

बेळगावात यंदा थंडी ‘लेट कमर’!

 belgaum

बेळगावात यंदा थंडी ‘लेट कमर’!
वातावरणातील विचित्र बदल प्रत्येक घटकासाठी ठरतोय घातक
ऊन-वारा-पावसाच्या विचित्र खेळाचा बसतोय फटका

बेळगाव लाईव्ह विशेष: जागतिक तापमानात होणाऱ्या बदलाचा परिणाम अलीकडे मोठ्या प्रमाणात जाणवू लागला असून ऋतूबाह्य ऋतूचा हंगाम अनुभवण्यास मिळत आहे. उन्हाळ्यात पाऊस तर कधी पावसाळ्यात उन्हाचा कडाका तर कधी ऐन उन्हाळ्यात सोसाव्या लागणाऱ्या झळा हिवाळ्यात जाणवू लागल्या आहेत. यंदा बेळगावमध्ये अवकाळी वळिवाने बेळगावकरांची पाठ सोडली नसून थंड हवामानाची प्रसिद्ध असणाऱ्या बेळगावमध्ये थंडीच्या वातावरणालाही उशीर झळा आहे.

साधारण नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुरु होणारा हिवाळा आणि कडाक्याची थंडी यंदा जानेवारीपर्यंत लांबली असून डिसेंबर महिन्यात देखील वळिवाचा तडाखा बेळगावकरांना सोसावा लागला आहे. हळूहळू बेळगावमध्ये गेल्या २ दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून जानेवारी महिन्यात सुरु झालेल्या थंडीच्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणावरणातील अनेक घटकांवर परिणाम होत असल्याचे जाणवू लागले आहे. गेल्या २ दिवसात थंडीचा जोर हळूहळू वाढत चालल्याने आरोग्यासंदर्भात तक्रारी देखील वाढल्या आहेत.

आधीच कोविडच्या नव्या विषाणूची धास्ती आणि अशातच वातावरणात झालेल्या बदलामुळे साथीचे आजार वाढत चालले आहे. ताप, सर्दी, खोकला यासारखे अनेक साथीचे आजार थंडीच्या दिवसात बळावतात. अंगदुखी, उत्साह नसल्यासारखे वाटणे, डोकेदुखी असे अनेक आजार याच काळात उद्भवतात. त्यात अचानक थंडी, अचानक उष्म्यात झालेली वाढ यामुळे तब्येतीच्या तक्रारीत अधिकच वाढ होत चालली आहे. कधी उबदार कपडे तर कधी गरमीने हैराण केल्यामुळे उन्हाळी कपडे वापरण्याची कसरत प्रत्येकजण अनुभवत आहे.Cold

केवळ माणसांच्या तब्येतीवरच वातावरण बदलाचा परिणाम होत नसून याचा फटका शेती क्षेत्रालाही सोसावा लागत आहे. अवकाळी वळिवामुळे अनेक भागातील सुगी लांबल्या असून यामुळे रब्बी हंगामावर सावट आले आहे. ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढत चालला असून अनेक पिके धोक्यात आली आहेत.

बेळगावमध्ये लागवड करण्यात येणाऱ्या मसूर, वाटाणा, हरभरा या पिकांची पेरणीही घटली असून पिकावर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांना वातावरणात होणाऱ्या वारंवार बदलाचा फटका बसला आहे. तसेच काजू, आंबा बागायतदारांनाही वातावरण बदलाचा फटका सहन करावा लागण्याची भीती आहे. थंडी, अवकाळी आणि पावसाचा विचित्र खेळ वनराई, वन्यजीव, पाळीव जनावरे यांच्यावरही प्रभाव पाडत आहे.

वातावरणात होणाऱ्या बदलाला अनुसरून ताजे आणि पोषक अन्नाचे सेवन करणे हितावह असते. वातावरणातील साऱ्या बदलांनी आपले दार ठोठावण्यास सुरुवात केली असून प्रदूषणाला आळा घालून, बदलत्या वातावरणानुसार आपली जीवनशैलीही बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. येत्या ८-१० दशकात संपूर्ण चित्र पालटणार हे नक्की आहे.

त्यादृष्टीने शासनानेही बदलत्या वातावरणाची जाणीव ठेवून आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना जारी करणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानाचा विचार करून तज्ज्ञांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या पाहिजे. नागरिकांना बदलत्या हवामानासंदर्भात मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे. धावत्या जगात आजारपणामुळे घरी बसणे प्रत्येकाला परवडणारे नाही. वाढती महागाई, वाढलेला वैद्यकीय खर्च आणि याचबरोबर कोविडनंतर सुरु झालेली आर्थिक टंचाई.. या साऱ्या गोष्टींचा सारासार विचार करून आपल्या तब्येतीची काळजी घेणे हि महत्वाची बाब आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.