Monday, December 23, 2024

/

बेळगाव भाजप नेत्यांमधील मतभेदाबाबत प्रदेश सरचिटणीसांचा खुलासा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये मतभेद असल्याबाबत अनेक वेळा प्रचिती आली आहे. माजी मंत्री, माजी आमदार यांच्यासह विविध आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याबाबत अनेक चर्चा-उपचर्चाही होत आहेत. मात्र, बेळगाव जिल्हा भाजपमधील नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, काही किरकोळ मतभेद असतील तर पक्षातील वरिष्ठ नेते ते दूर करतील आणि आगामी निवडणुकीत भाजप एकजूटीनेच सामोरे जातील, असा विश्वास महेश टेंगिनकाई यांनी व्यक्त केला.

बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महेश टेंगिनकाई यांनी हा खुलासा केला आहे. भाजप विजय संकल्प यात्रेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. याशिवाय पक्ष संघटने संदर्भात बैठक घेण्यासाठी तसेच एम. के. हुबळी येथे जाहीर सभेत सहभागी होण्यासाठी देखील अमित शहा यांचा दौरा ठरला आहे. या संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती देताना महेश टेंगिनकाई यांनी बेळगाव भाजपा मध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत अशा चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

या दौऱ्यात कित्तूर, खानापूर आणि बैलहोंगल या तीन मतदारसंघासाठी एम. के. हुबळी येथे दुपारी ४ वाजता अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील आदींसह भाजपमधील विविध नेते सहभागी होणार आहेत. या सभेत पक्ष संघटनेबाबत अमित शहा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणार आहेत. यादरम्यान बेळगावमधील यूके २७ या हॉटेलमध्ये पक्षाच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या दोन सभादेखील अमित शहा घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील भाजपचे मिशन -१५० यशस्वी करण्यासंदर्भात ते महत्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत, असे महेश टेंगिनकाई यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात मत व्यक्त करताना ते म्हणाले, अद्याप पक्षाने कोणालाही उमेदवारी जाहीर केली नाही. ग्रामीण मतदार संघात नागेश मन्नोळकर यांना घेऊन रमेश जारकीहोळी यांनी प्रचार सुरु केला आहे. मात्र अद्याप उमेदवारीबाबत निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय पक्षाचा उमेदवार असल्याचे भासवून कोणी प्रचार करत असेल तर पक्ष श्रेष्टींच्या निदर्शनात हि बाब नक्कीच आणून देण्यात येईल, आणि संबंधितांवर कारवाईही होईल, असे ते म्हणाले.

यावेळी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, राज्य प्रवक्ते एम. बी. जिरली, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, आ. अनिल बेनके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.